
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानांतर्गत आयोजितपीएम जनमन शिबिराचा आदिम जमातीतील बांधवांनी लाभ घ्यावा
ठाणे, प्रतिनिधी :- देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) मागील वर्षी 15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू केला होता. या अभियानाचा दुसरा टप्पा दि.25 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली असून नोडल अधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्यात आदिम वस्ती असलेल्या शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण व अंबरनाथ या तालुक्यांमध्ये विविध विभागांच्या सहकार्याने योजनांचा लाभ देण्याची सुरुवात करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत दि.29 ऑगस्ट 2024 रोजी शहापूर तालुक्यातील खर्डी आणि वेळूक या दोन गावांमध्ये पीएम जनमन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खर्डी येथील शिबिरात 10 आधार कार्ड, 65 जातीचे दाखले, 31 पीएम किसान निधी योजना, 3 आयुष्यमान भारत कार्ड, 3 पीएम मातृ वंदना योजना आणि 7 सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला तसेच वेळूक येथील शिबिरात 20 आधार कार्ड, 101 जातीचे दाखले, 35 घरकुल योजना अर्ज, 15 उज्वला गॅस नोंदणी, 6 उत्पनाचे दाखले आणि 3 आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. यावेळी 41 व्यक्तींची सिकलसेल तपासणी देखील करण्यात आली.
आज दि.30 ऑगस्ट 2024 रोजी भिवंडी तालुक्यातील कुरूंद या ठिकाणी पीएम जनमन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी तथा या अभियानाच्या नोडल अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.डी.डी.काळपांडे हे उपस्थित आहेत.
उद्या दि.31 ऑगस्ट 2024 रोजी मुरबाड तालुक्यातील पळू या ठिकाणी पीएम जनमन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून येथील शिबिराचा लाभ पळू, एकलहरे, रामपूर धसई, कलबांड व सोनावळे या ग्रामपंचायतील आदिम जमातीतील व्यक्तींना होणार आहे. दि.2 सप्टेंबर 2024 रोजी शहापूर तालुक्यातील शिरोळ आणि लाहे या ठिकाणी, मुरबाड तालुक्यातील टोकावळे आणि सरळगाव याठिकाणी आणि भिवंडी तालुक्यातील दाभाळ या ठिकाणी पीएम जनमन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
पीएम जनमन शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर येथील प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांच्या समन्वयाने आणि तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पोस्ट विभाग, बैंक आणि इतर विभाग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.



