
नवरात्र, उत्सव स्त्री शक्तीचा-सण-उत्सव जीवन समृद्धीसाठी पूरक -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
राज्य प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर , भारतीय संस्कृतीतील सण उत्सव हे व्यक्ती विकासासाठी पूरक आणि महत्वपूर्ण आहेत. साजऱ्या करण्याच्या पद्धतीमुळे माणसाचे जीवन सर्वांगाने होते,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नवरात्र, उत्सव स्त्री शक्तीचा कार्यक्रमांतर्गत “महिलांसाठी संतुलित जीवनशैली आणि व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानास डॉ. स्मिता अवचार ह्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनच्या संगीता राठोड, तहसिलदार पल्लवी लिगदे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी महिला कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन महत्त्वाचे आहे ,यातून बौद्धिक विकास साध्य होतो. वाचनातून मिळालेला ज्ञानाचा आपल्या कामकाजामध्ये गतिमानता व समृद्धता आणण्यासाठी उपयोग करता येईल. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जे सण उत्सव भारतीय परंपरेनुसार आपण साजरे करतो, त्या प्रत्येक सण- उत्सवाच्या मागे एक विज्ञान असून याचा उपयोग व्यक्तीचे जीवन निरोगी आणि समृद्ध करण्यासाठी होतो हे सर्व महिलांना माहीत असणे आवश्यक आहे. भावी पिढीवर संस्कार करण्याची जबाबदारी देखील महिलांवर असल्याने महिलांना सर्व बाजूने समतोल राखत व नकारात्मकतेवर मात करून आपुलकीची भावना व सकारात्मकता वृद्धिंगत करणे हे एक मोठे आव्हान असून यासाठी स्वतःसाठी वेळ काढून आपापले छंद आणि आवडी जोपासणे आवश्यक आहे .
स्मिता अवचार यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की महिलांना कुटुंब आणि नोकरी व्यवसाय सांभाळताना होणारी द्विधा अवस्था ही एक मोठं आव्हान असून हे सांभाळताना तणावाला सामोरे जावे लागत आहे .याचा समतोल सांभाळणे हे एक मोठा पेच सध्याच्या नोकरी करणाऱ्या महिलांसमोर असून यासाठी कार्यालय आणि घर हा फरक करून स्वतःला ओळखणे आवश्यक आहे तसेच आपल्या मर्यादा आणि क्षमता यानुसार काम करणे आवश्यक आहे. यामध्ये स्वतःला वेळ देत असताना आवडी निवडी, विचारांची देवाण-घेवाण, संवाद, समुपदेशन विविध भावनांचा निसरा होण्यासाठी मैत्रिणी असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कर्मकांडात न अडकता योग्य अयोग्य याची पारख होणे आवश्यक असल्याचेही सांगितले. कार्यालयात काम करत असताना आपल्या आनंदाचे क्षण आणि दुःखाची कारण,ती व्यक्त होण्याचे मैत्रीनी सारखी आपली जागा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी मिळून मिसळून राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. आधुनिकते मुळे वेगवेगळ्या व्यवस्था उभे राहत असून सध्या त्या महिलांच्या कार्यामध्ये सहाय्यभूत ठरत आहेत. यामुळे आपल्या क्षमता आणि बलस्थाने ओळखून सकारात्मक जीवन, मिळालेल्या संधीचा उपयोग करत जीवन जगावे व आपल्या तणावाचे व्यवस्थापन हे आपल्या स्वतःला ओळखून करणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन उर्मिला धारूरकरआणि आभारप्रदर्शन रूपा चीत्रक यांनी केले.
****



