
नवी मुंबई महानगरपालिका**विधानसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणी मतदार जनजागृती*
नवी मुंबई प्रतिनिधी-महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतदार जनजागृती स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येत असून आज बेलापूर विभागात सेक्टर 11 रेल्वे स्टेशन परिसर आणि बेलापूरगाव व शहाबाजगाव परिसरात स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहयोगाने जनजागृती रॅली काढून मतदान करणेविषयी आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी थांबून तेथील नागरिक समुहांसोबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आल्या.
अशाच प्रकारे वाशी विभाग कार्यक्षेत्रात वाशी रेल्वे स्टेशन तसेच वाशीगाव आणि परिसरात नागरिक समुहांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सेक्टर 9 ए येथील भाजी मार्केट व मोतीमाला ज्वेलर्स सेक्टर 9 परिसरातील व्यावसायिक आणि ग्राहकांशी संवाद साधून त्यांनाही 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले आणि सामुहिक मतदार प्रतिज्ञा घेण्यात आल्या.
मतदानाबाबत तरूणाईच्या मनात असलेली उत्सुकता लक्षात घेत सेक्टर 19 ए, नेरूळ येथील स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात युवकांशी संवाद साधत त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले तसेच मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदार प्रतिज्ञाही घेण्यात आली.
मतदानाचा अधिकार मुलांना नसला तरी ते उद्याचे जागरूक नागरिक असल्याचे लक्षात घेत त्यांच्या मनात आत्तापासूनच मतदानाचे लोकशाहीतील महत्व रूजविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत दिघा ईश्वरनगर येथील संजीवनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली मोठ्या संख्येने सहभागी विद्यार्थ्यांनी यशस्वी केली. मतदान करण्याविषयीचे फलक उंचावत, घोषणा देत त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले व 20 नोव्हेंबरला मतदान करण्याचे आवाहन केले. अशाचप्रकारे सेक्टर 4 ऐरोली येथील श्रीम. सुशिलादेवी देशमुख विद्यालयाच्या एनएसएस पथकानेही ऐरोली परिसरात रॅलीव्दारे जोरदार जनजागृती केली.
नेरूळ विभाग कार्यालय क्षेत्रात ‘मतदारराजा जागा हो’ या पथनाट्याचे प्रयोग करीत मनोरंजनातून मतदानाचा अधिकार कर्तव्यभावनेने बजावण्याविषयी प्रबोधन करण्यात आले.
नवी मुंबईतील 150 व 151 या दोन्ही विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व्यापक प्रमाणात जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत नमुंमपा क्षेत्रातील 150 व 151 या दोन्ही विधानसभा मतदारसंघाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त स्वीप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यामध्ये बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी श्री.सागर मोरे व ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी श्रीम.अभिलाषा म्हात्रे – पाटील व त्यांचे सहकारी मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करीत आहेत. यामध्ये शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव आणि मुख्याध्यापक – शिक्षकांचेही सहकार्य आहे. आजही बेलापूर विभाग अधिकारी डॉ.श्रीकांत तोड़कर, नेरूळ विभाग अधिकारी श्री. जयंत जावडेकर, ऐरोली विभाग अधिकारी श्री. शंकर खाडे, दिघा विभाग अधिकारी श्री.भरत धांडे यांनी आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले.



