दररोज पाणी, सर्वांगीण विकासाची हमी हाच आपला संकल्पमहाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांचे जालनेकरांना आश्वासन..
जालना : प्रतिनिधी शहरातील जनतेला दररोज पाणी आणि सर्वांगीण विकासाची हमी हाच आपला आगामी काळातील संकल्प राहणार असल्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी येथे बोलताना सांगितले.
जालना शहरातील गांधीनगर, भीमनगर, मंगळबाजार, नूतन वसाहत, कन्हैय्या नगर, चंदनझिरा, नॅशनल नगर, तटूपुरा, दुःखी नगर,अंबड रोड आदी भागात मविआचे उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभेत उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आ. गोरंटयाल म्हणाले की, तब्बल २० वर्षे आमदार आणि त्यातील दहा वर्षे राज्यमंत्री असतानाही ज्यांना मतदार संघाच्या विकासासाठी एकही ठोस काम करता आले नाही. ते विकासाच्या बाबतीत आपल्यावर टीका करत आहेत. जायकवाडी योजनेद्वारे जालना शहराला पाणीपुरवठा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही दोन ठोस मोठी काम आपण आपल्या कारकीर्दीत केली असून, ग्रामीण भागात बहुतांश गावांत रस्ते, समाज मंदिर, पाणी पुरवठा योजना, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांत अशी कितीतरी अधिक पटीने विकासाची कामे आपण पूर्ण केली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे, प्रभागांतर्गत रस्ते, अंतर्गत जलवाहिनी यासह अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. आणि ही सर्व कामे जनतेसमोर असल्याने या निवडणुकीत जनतेचे पाठबळ आणि आशीर्वाद यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.
अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रात जल शुद्धीकरणाची क्षमता वाढविण्यासाठी काम सुरू आहे. तसेच घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय ते शहरातील जुन्या एमआयडीसी भागात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्र ही निकामी झालेली जलवाहिनी बदलण्याचे काम लवकरच पूर्ण झाल्यानंतर आगामी काळात जालना शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा आणि सर्वांगीण विकास तसेच एखादे विद्यापीठ जालन्यात मंजूर करण्याचा प्रयत्न आपला राहील अशी ग्वाही आ. गाेरंट्याल यांनी दिली. उपरोक्त सर्वच भागांमध्ये आयोजित सभांना हजारो महिला, पुरुष, युवक कार्यकर्ते उपस्थीत होते. ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत आ. गोरंटयाल यांच्यासह अन्य उपस्थीत मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात आले.
चौकटकाही उमेदवार मतांच्या विभाजनासाठी निवडणूक रिंगणातकाही उमेदवार हे केवळ मतांचे विभाजन करण्याच्या हेतूने निवडणूक लढवत असून, अशा उमेदवारांना जागरुक मतदारांनी ओळखले आहे. त्यामुळे मतांचे विभाजन करण्याचा आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा डाव मतदार निश्चितपणे हाणून पाडणार असल्याचा विश्वास उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला.