प्रशासन गाव की ओर’ सुशासन सप्ताह जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न-प्रलंबित कामांचा निपटारा वेळेत करा-जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड, प्रतिनिधी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त केंद्र शासनाने देशव्यापी सुशासन सप्ताह सुरु केला आहे. प्रशासन जनतेसाठी काय करते याची माहिती व्हावी, हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित कामांचा वेळेत निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुभाष सोनावणे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा प्रशासन अधिकारी (न.प्र.) श्याम पोशेट्टी, उपविभागीय अधिकारी पेण प्रविण पवार तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, शहरीकरण जरी वाढत असले, तरी गावांमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ राहत असतात. येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे, हे प्रमुख काम आहे. त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे, सार्वजनिक तक्रारी निर्गत करणे, ऑनलाईन सेवेमधील विलंबितता टाळून, त्या पुरविणे आदी गतीने कामे करावीत. आपले सरकार पोर्टल तसेच सेवा हमीमधील अपिले वेळेत काम पूर्ण करुन विहित वेळेत तक्रारींचा निपटारा करा त्याचबरोबर गतीने कामे करावीत, अशा सूचनांही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुभाष सोनावणे मार्गदर्शन करताना म्हणाले, कामकाज करताना पारदर्शकता असली पाहिजे आणि कामकाज विहित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कार्यालयीन प्रलंबितता दूर करणे, हा या सप्ताहाचा मूळ उद्देश आहे. तक्रारदारांच्या टपालासाठी वर्गीकरण करा. त्यानुसार तक्रारींचे प्राधान्यक्रम ठरवा, त्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवा. तक्रारदारांचे अर्ज प्रथम निर्गत करणे आवश्यक आहे. उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके म्हणाले की, ‘प्रशासन गाव की ओर ही’ संकल्पना घेऊन सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या कार्यशाळेवेळी प्रत्येक शासकीय विभागांनी मागील व पुढील वर्षात जिल्ह्यात सुशासन उपक्रमांतर्गत राबविलेल्या व राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आली.या कार्यशाळेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बाल कल्याण निर्मला कुचिक, लिड बँक मॅनेजर विजय कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी पाणी पुरवठा श्रीमती शुभांगी नाखले आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.000000