vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विशेषलेख- शिवजयंती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज..

 विशेषलेख- शिवजयंती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज..

 राज्य प्रतिनिधी-“महाभाग्यवान मी… महाराष्ट्र माझी मायभूमी महाराजांचीच ही महतकरणी!” शुक्रवारचा दिवस होता, रात्रीची वेळ होती. अवध्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद अन् काळजी झळकत होती. साऱ्या गडाचे लक्ष लागले होते. ते जिजाऊंकडे. शिवनेरीत बांधलेला पाळणा मोठ्या प्रतिक्षेत होता. क्षणातच आनंद उधळीत एक बातमी चोही दिशेला वाऱ्यासारखी पसरली. पुत्ररत्न झाला… पुत्ररत्न झाला! गडावरील सारं वातावरण ढवळून निघालं होतं. गडावर सर्वत्र नगारे-चौघडे वाजू लागले होते. चोहीकडून एकच वार्ता कानावर पडत होती. जिजाऊंच्या उदरी पुत्ररत्न झाला… अर्थातच शिवबाचा जन्म झाला अन् जणू काय भारतमातेच्या रक्षणार्थ हिंदवी स्वराज्याचा क्रांतीसूर्यच उदयास आला. ह्या शुभ बातमीच्या प्रित्यर्थ रयतेचं तोंड गोड करण्यासाठी सर्वत्र साखरेचं वाटप झालं. लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक ठळकपणे दिसत होती. माँसाहेब जिजाऊंच्या मुखावर सोन्यावानी चमक झळकत होती. खरंतर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांना आकाशही ठेंगणं वाटत होतं. तो भाग्यवान दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. चला तर, शिवजयंतीनिमित्त आपण सर्वधर्मीय लोक शिवछत्रपतींच्या शौर्यगाथेला त्रिवार मानाचा मुजरा करूया अन् त्याबरोबरच शिवजयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करूया! बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो! जय भवानी, जय शिवछत्रपती।

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीला महाराजांनी भारतातल्या पहिल्या आरमाराची स्थापना करण्याचा मान दिला. शत्रु पक्षाला गाफील ठेऊन गनिमी काव्याच्या युद्धतंत्राद्वारे शिवबाचे सैनिक कल्याण खाडीतून आपल्या आरमाराद्वारे हल्ले करायचे. केवळ भारतातल्या अंतर्गत शत्रूनाच नव्हे तर, डच, पोर्तुगाल, इंग्रज, मोगल आदींना सुद्धा शिवछत्रपतींच्या आरमार यंत्रणेने जेरीस आणले होते. हिंदुस्थानाच्या इतिहासात सागरी बळाची उपयुक्तता व ताकद ओळखली ती शिवरायांनी. त्यांनी भारतीय आरमाराची या देशात सर्वप्रथम उभारणी केली. त्यामुळे शिवछत्रपतींना हिंदुस्थानी आरमाराचे (इंडियन नेव्ही) आद्यप्रणेते म्हणतात. महाराजांच्या जंगी बेड्यात सुमारे 74 गलबते होती. अर्थातच शिवकालीन काळात महाराजांच्या आरमार दलाचा सर्वदूर दबदबा होता. दरम्यान दिपावलीच्या शुभमुहूर्तावर महणजेच 24 ऑक्टोबर 1657 रोजी शिवरायांनी कल्याणला स्वतंत्र करून दुर्गाडीवर आपल्या हिंदुत्वाचा भगवा फडकवला. मराठी स्वराज्याची मुहूर्तमेढ कल्याणहून करत शिवरायांनी पुढे युद्धकौशल्याच्या बळावर सलग 40 किल्ले सर केलेत. राष्ट्रभक्तीसह हिंदुत्वाची भावना रयतेच्या मनात बिंबविण्याच्या दृष्टिकोनातून शिवबाने जिजाऊंच्या संकल्पनेतून दुर्गाडी किल्ल्यावर भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. यास्तव आम्ही कल्याणकर माँसाहेब जिजाऊ अन् शिवरायांचे ऋणाईत होऊन त्यांना त्रिवार नमन करतो.

मित्रहो, 1674 साल उजाडलं अन् मराठी राज्याच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. दरम्यानच्या काळात शिवराज्याभिषेकसंदर्भात स्वकियांनी आणि परक्यांनी अनेक वेळा अडथळे आणलेत, त्यामुळे जिजामाता अत्यंत व्यथित झाल्या होत्या. त्या नेहमी शिवबाच्या राज्याभिषेकबाबत चिंतित असायच्या, शेवटी जिजामातांच्या अथक प्रयत्नांना यश आलं. काशीच्या गागाभट्टांना शिवबाच्या राज्याभिषेकचं पौरोहित्य सोपविण्यात आलं. या कारणास्तव रायगड नटूनथटून उभा होता. जिजाऊंच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी रायगडावर मोठी गर्दी उसळली होती. रायगडाच्या प्रवेशद्वारावर देशी व परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी खरेखुरे गजराज उभे ठाकले होते. 6 जून 1674 रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिवबाचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. तोफांच्या तोफांच्या सलामीनं अन् तुतारीच्या निनादात किल्ले रायगडावरील वातावरण ढवळून निघालं होतं. याप्रसंगी शिवरायांच्या नावाचा सर्वत्र जयघोष होत होता. गुलालाची उधळण होऊन किल्ल्याचा सारा परिसर भगवामय होऊन आनंदाने बहरून गेला होता. राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी महाराजांच्या नावापुढे छत्रपती अश्या एका अर्थानं नामकरण झालं. जिजाऊंच्या डोळ्यांचे पारणं फिटलं. जीवनाचं अखेरचं स्वप्न साकार झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी जणू एकाएक नाहीशी झाली होती. त्या तृप्त झाल्या. त्या धन्य झाल्या. त्यांना ह्याची देही ह्याची डोळा शिवबाचा राज्याभिषेक पहावयास मिळाला.

राज्याभिषेक झाल्यानंतर शिवबा हे सिंहासनावर विराजमान झाले. त्या आधी त्यांनी गागाभट्ट आणि जिजाऊ मातेचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले. जिजाऊ ह्या शिवछत्रपतीची दृष्ट काढत म्हणाल्या, शिवबा तुम्ही राजा झालात, रयतेचे राजा झालात. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही छत्रपती झालात. आता तुम्ही आदर्श राजा होऊन पृथ्वीवर किर्तीमान व्हा. शिवबाचा राज्याभिषेक व्हावा, यासाठी जिजाऊंनी आपला जीव जणू मुठीत घट्ट धरून ठेवला होता. कारण हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवबाला छत्रपती केल्यावर अवघ्या आठवड्यातच त्यांना देवाज्ञा झाली. धन्य त्या जिजाऊ माँसाहेब आम्ही मराठी भूमिपुत्र वंदनीय जिजाऊ माँसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा करतो.

शिवबा हे मातृभक्त होते. ते मातेची आज्ञा शिरसावंद्य मानत असत. शिवबांचे पिताश्री शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारी मोठे सरदार होते. परिणामी मराठी राज्याची संपूर्ण धुरा जिजाऊ माँसाहेबाच्या खांद्यांवर आली होती. दरम्यान जिजाऊंनी शिवबाला युद्धतंत्राचे परिपूर्ण प्रशिक्षण देऊन पारंगत केलं. शिवबाला आदर्श राजा बनविण्याचा जिजाऊंचा मानस होता.त्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्यकारभाराचे बारकावे ज्ञात करून देण्यात आले होते. शिवबाची मातृभक्ती अपरंपार होती, तर जिजाऊंचे पुत्रप्रेम अतूट होतं.

शिवबा हे मातेच्या आज्ञेप्रमाणे राज्यकारभार करत असत. विशेष म्हणजे ते मातेच्या आज्ञा शिरसावंद्य मानत असत. एके दिवशी माँसाहेबांनी “मला कोंढाणा हवा आहे”, अशी इच्छा व्यक्त केली असता, शिवरायांनी लगेच आपले शूरवीर विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांना कोंढाणाच्या दिशेने कूच करण्याचा फर्मान सोडला. त्याच दिवशी नेमका त्यांच्या मुलाचा लग्नसोहळा होता. तरी देखील तानाजींनी शिवबाची आज्ञा शिरसावंद्य मानून कोंढाण्यावर स्वारी करून तो सर केला. परंतु तानाजी धारातिर्थी पडले. त्यामुळेच शिवकालीन इतिहासात “गड आला पण सिंह गेला” हे सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं. इतकेच नव्हे तर, जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवबा अन् त्यांच्या शुरवीर मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेची आई जगदंबेसमोर शपथ घेतली. शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजे संभाजी महाराजांनी स्वकियांची बंडाळी मोडीस काढून शंभरहून अधिक युद्धे जिंकली. या पार्श्वभूमीवरच शिवकालीन इतिहासाचा शिवशंभु कालखंड असा उल्लेख केला जातो.

शिवबा हे परस्त्रीला मातेसमान मानत असत. स्री मग ती आपल्या राज्यातली असो वा परक्या मूलखातली, ती मातेसमानच असते, ही शिकवण शिवबांनी सैनिकांसह रयतेलाही दिली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले असता. ही कृती महाराजांना अजिबात आवडली नाही. त्यांनी त्या परस्त्रीला मातेप्रमाणे आदरतिध्य करून तिला तिच्या राज्यात सन्मानाने पोहोचविले. या घटनेला शिवकालीन इतिहास साक्षीदार आहे, अशीच एक अप्रिय घटना घडली की, एका गावप्रमुखाने स्त्रीच्या अब्रूची हेळसांड केली. हे कळल्यावर त्या दोषी व्यक्तीचे हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याचा महाराजांनी फर्मान काढला. हे सर्व माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांचे फलित होते. शिवबा हे खऱ्या अर्थानं स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. स्त्रीयांना स्वरक्षण करता यावे, या उद्देशाने शिवरायांनी आपल्या राज्यातील महिलांना तलवारबाजीचे प्रशिक्षण देण्याची सोय केली होती. तात्पर्य, शिवरायांना स्त्रीयांबद्दल नितांत आदरभाव होता. वास्तवात शिवकालिन काळात स्त्रीला देव्हाऱ्यातली देवता मानायचे.

शिवबा हे शेतकऱ्यांचे हितचिंतक होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. हा विचार त्यांनी रयतेला दिला. शिवरायांच्या उच्च सैनिकांत सर्वाधिक शेतकऱ्यांची मुलं होती, हे जाणून त्यांनी शेतकऱ्यांचे हित जपण्यास नेहमी प्राधान्य दिले. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात बळीराजाला प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, सर्वाधिक उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन ते गौरवित असत. तर अल्पभूधारक शेतकऱ्याऱ्यांना शिवकाळात मोफत बी-बियाणे पुरविली जायची. तसेच शेतसारा किफायतशीर प्रमाणात आकारला जायचा. पडिक जमिनीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्याकडून अर्थसहाय्य दिलं जायचं. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला जात असे. वृक्षतोड करू नये, असे कडक आदेश शिवरायांनी राज्यात काढले होते. शिवबा हे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यास अग्रक्रम देत असत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली तर, राज्याला संपन्नता येईल, असे त्यांचे ठाम मत होते. शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, असं सक्त फर्मान त्यांनी काढले होते. शेती हा हिंदवी स्वराज्याचा पायाभूत उद्योग असल्यानं, युद्धकाळात उभ्या पिकांची नासाडी करणे, हा दंडनीय अपराध मानला जायचा. ह्या सर्व गोष्टी पाहिल्यावर शिवछत्रपती हे शेतकऱ्यांचे कैवारी होते, हे दृष्टोत्पत्तीस येते.

मोगल बादशहांच्या तुलनेने सैन्यदल व युद्धसामग्री कमी असूनही शिवछत्रपतींनी गनिमी कावा युद्धतंत्राचा अचूक प्रयोग करून शत्रूपक्षांना नामोहरम केलं. वास्तवात शिवरायांचे युद्धनैपूण्य अद्वितीय होतं. अफजलखानाचा वध, सुरतेची लूट, आग्राच्या नजरकैदेतून शिताफीने केलेली सुटका, शाहिस्तेखानवर हल्ला करत त्याच्या हाताची बोट छाटणं, कोंढाण्याचा विजय या सर्व ऐतिहासिक घटनांमधील यश हे शिवबाच्या गनिमी कावाचे फलित होतं. त्यामुळेच आजही महापराक्रमी राजा महणून रयतेच्या मनावर त्यांचे अधिराज्य आहे

राज्याची मदार ही गडकिल्ल्यांवर आहे. हे जाणून शिवछत्रपतींनी राजगड, शिवनेरी, पुरंदर, पन्हाळा, सिंहगड, विशालगड, प्रतापगड आदी किल्ले, कोट, जंजिरे उभारून राज्याची तटबंदी मजबूत केली. शिवकालीन राज्यव्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध होती. राज्यकारभार पारदर्शक व गतिशील व्हावा, यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले होते. शिवकालीन नोकऱ्या अन् सेन्यभरती ही जाती धर्मावर आधारित नव्हे तर, वैयक्तिक गुणवत्ता व युद्धनैपुण्यावर होत असे. राजाप्रती सरदार व सैनिकांची अपार निष्ठा तर, शिवबाचा त्यांच्यावरील दृढविश्वास असं एकमेकात अतूट बंध होतं. सैन्यदलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरदार अन् सैनिकांना शिवबाच्या हस्ते बक्षिसे व उच्च पदे बहाल केली जात असत. यामुळेच शिवरायांची कुशल प्रशासक म्हणून रयतेत ख्याती होती. आजही त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्राचा राज्यकारभार हाकला जात आहे. याचा आम्हा मराठी जनमानसाला सार्थ अभिमान आहे.

🙏🙏🙏

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात आजपासून दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात, जाणून घ्या विसर्जनाची पुजा विधी, आज पहा महाराष्ट्रात हवामानाचा कसा आहे अंदाज!

vishwatmaklokswamivarta

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी*

vishwatmaklokswamivarta

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विधानसभा प्रश्नोत्तर -सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन,ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद; मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करा

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचा निर्णय : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल शासकीय महापूजा सुरु असताना खुले राहणार मुखदर्शन…