जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे आयोजन उद्योजक,नवउद्योजक,
गुंतवणूकदारांनी उपस्थित राहावे
रायगड प्रतिनिधी- महाराष्ट्रातील गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरिता गुंतवणूक आकर्षित करणे, विकासाला चालना देणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे या उद्देशाने स्थानिक पातळीवर शासनाच्या उद्योग विभागाशी संलग्नित विभागांच्या सहाय्याने “जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025”चे आयोजन दि.11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9:30 वा.पासून जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेस जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, गुंतवणूकदार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या यांनी केले आहे.
या गुंतवणूक परिषदेस श्रीमती.व्ही.एम. शिरसाठ, उद्योग सह संचालक,कोकण विभाग,ठाणे, संतोष थिटे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पनवेल, जी.एस. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र ,रायगड-अलिबाग तसेच शासनाच्या उद्योग विभागाशी संलग्नित विभागाचे अधिकारी रायगड जिल्ह्यातील औद्योगिक संघटनाचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाकरीता गतवर्षी फेब्रुवारी-मार्च 2024 दरम्यान जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यांतील परिषदा मध्ये 2 हजार 652 सामंजस्य करारांवर स्वाक्ष-या होऊन रु. 96,680 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून त्यात 2,31,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विभागस्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे सहा विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी मार्च-2025 मध्ये आयोजन करण्यात आले होते.
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित गुंतवणूकदार यांच्या समवेत उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन सोबत सामंजस्य करार होणार आहे तसेच गुंतवणूक विषयक धोरणाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
मा.विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशान्वये जिल्हास्तरावर स्थानिक पातळीवर शासनाच्या उद्योग विभागाशी संलग्नित विभागांच्या सहाय्याने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयेाजन करण्यात येत आहे.