vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पपूर्वीसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गती द्यावी   – जिल्हाधिकारी अशोक काकडे

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पपूर्वीसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गती द्यावी   – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली, प्रतिनिधी: शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत या योजनेचे सांगली जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गांभीर्याने कार्यवाही करावी. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.

मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपवनसंरक्षक नीता कट्टे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सोनिया सेठिया, महावितरणचे अधीक्षक अभियंता सवाईराम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता पी. व्ही. पंचमुख, अतिरीक्त कार्यकारी अभियंता देवदत्त हसबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्यासह उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून एकूण 47 जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यापैकी 29 जागांचे क्षेत्र आवाडा या कंपनीस हस्तांतरीत करण्यात आले आहे. या 29 जागांमधील सौरऊर्जा प्रकल्पातून 207 मेगावॅट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. यापैकी बसर्गी व जिरग्याळ (ता. जत), मणेराजुरी (ता. तासगाव), माडगुळे व लिंगीवरे (ता. आटपाडी) या ठिकाणी सहा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर कोसारी, बेवनूर, तिकोंडी, बेळुंडगी, मोरबगी, माडग्याळ, शेड्याळ, हळ्ळी (ता. जत), केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ), भाग्यनगर (ता. खानापूर) पळसखेल (ता. आटपाडी) या ठिकाणचे प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. सुरू असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पांसाठी टप्पेनिहाय वेळापत्रक तयार करावे व कालमर्यादा निश्चित करून ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ही योजनेअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रात्रीचे अपघात टळतील. बळीराजा मोफत वीज योजनेतून ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज मिळणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संबंधित नियुक्त कंपनीने स्थानिक संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवावा. एक समन्वयक नेमून संबंधित गावच्या ग्रामस्थांना प्रकल्पाचे फायदे समजावून सांगावेत. प्रकल्पासाठी पोषक वातावरण निर्मिती करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

अधीक्षक अभियंता सवाईराम यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती सादर केली. आवाडा कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रकल्प कार्यान्वित करताना भूमी संपादन, सद्यस्थिती व येणाऱ्या अडचणी विषद केल्या.

00000

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 एप्रिलला

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

बांधा बांधावर शेतकरी-अधिकारी सुसंवाद-जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला शेतात

भारताने मेरठ येथील आरव्हीसी सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त घोड्यांचे रोगमुक्त क्षेत्र केले स्थापन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन

विशेष लेख :-सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती‘राष्ट्रीय एकता दिवस’ विशेष स्वरूपात साजरा होणार !

vishwatmaklokswamivarta