एल्डर लाईन – १४५६७; ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन; एल्डरलाईन- १४५६७, सर्व राज्यांत व केंद्र शासित प्रदेशात सुरु करण्यात आली आहे, असे जनसेवा फाऊ न्डेशन पुणे यांनी कळविले आहे.
ही हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये चालविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात एल्डर लाईन १४५६७ ही सेवा ऑगस्ट २०२१ पासून राबवली जात आहे. या मध्ये कनेक्ट सेंटर व फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून व मदतीने कार्यरत आहे. आज अखेर, राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक कॉल्स आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष प्रकारे मदत हेल्पलाइन ने केली आहे. तसेच तीस हजार हून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत . एल्डर लाईन साठी १४५६७ हा क्रमांक टोल-फ्री आहे. एल्डर लाईन चे कार्य आठवड्याचे सर्व दिवस (म्हणजेच रविवार ते शनिवार) सकाळी ८.०० ते संध्याकाळी ८.०० चालते. संपूर्ण वर्षातील ३६२ दिवस सुरू असते (फक्त २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर रोजी सुट्टी असते)
या हेल्पलाईन द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा
माहिती देणे : आरोग्य विषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठां संबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती.
मार्गदर्शन : कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.), आर्थिक, पेन्शन संबंधित सल्ला, आणि सरकारी योजनांची माहितीभावनिक समर्थन: चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, जीवन व्यवस्थापन, (वेळ, ताण, राग व्यवस्थापन) मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण (मृत्युपत्र बनवण्याचे महत्व इ.)
क्षेत्रीय पातळीवर मदत: विविध सरकारी यंत्रणा, भागधारक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था यांचे मदतीने बेघर वृद्ध, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिक, किंवा हरवलेल्या व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न व त्यांना परिवाराशी पुनर्मिलन करणे साठी कार्य करणे.