vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्याप्रदेश

जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संवेदनशीलतेने विट्याच्या रेयांश पवारला मिळाले जीवनदान- जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात दात्यांचा मोलाचा हातभार- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतूनही मिळाले एक लाख पंच्याहत्तर हजार…

जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संवेदनशीलतेने विट्याच्या रेयांश पवारला मिळाले जीवनदान- जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात दात्यांचा मोलाचा हातभार- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतूनही मिळाले एक लाख पंच्याहत्तर हजार…

         राज्य प्रतिनिधी -सांगली’ रेयांश अवधूत पवार हा विटा येथील सहा वर्षांचा चिमुरडा.. इतक्या लहान वयात त्यानं जगण्यासाठी संघर्ष केलाय. एकदा नाही दोनदा… हृदयाशी संबंधित जन्मजात दोषावर मात करण्यासाठी रेयांशची हृदयाला भिडणारी ही कहाणी… योग्य वेळी योग्य लोकांची साथ मिळाली, तर कुठलीही लढाई जिंकता येते, हे सांगणारी… समाजात अजूनही संवेदनशीलता जागृत आहे, याची उमेद जागवणारी…

 रेयांशचे वडील एका कापड दुकानात काम करतात तर आई गृहिणी. जन्मताच त्याला हृदयाला छिद्र असल्याचे समजले. अवघा दीड महिन्यांचा असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सगळं काही ठीक चालले होते. आता तो शाळेतही जावू लागला.

दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत इको शिबिर घेण्यात आले. या तपासणीत रेयांशच्या हृदयाची झडप छोटी असल्याचे आढळले. मात्र, त्याची तब्येत पाहता चार-पाच तज्ज्ञ डॉक्टरांनी संभाव्य जोखमीमुळे हात मागे घेतले. कारण स्पष्ट होतं – बालकाच्या जीवाला धोका होता.

   लहानग्या वयात एवढी जोखमीची शस्त्रक्रिया करण्याची चिंता होतीच. शिवाय सगळ्यात मोठा अडथळा होता तो आर्थिक निधीचा, कारण शस्त्रक्रियेचा खर्च दहा लाख रुपये होता. पवार कुटुंबासाठी ही रक्कम उभारणे पूर्णपणे अशक्य होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी राष्ट्रीय बालस्वास्थ्य योजनेतून एक लाख पंच्याहत्तर हजारांची मदत तत्काळ मंजूर केली. पण उर्वरित आठ लाख पंचवीस हजाराचे काय? असा प्रश्न होता.

आमदार सुहास बाबर यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या. या टप्प्यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः पुढाकार घेतला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊ घातलेल्या एम.आर.आर हॉस्पिटल ठाणेशी संपर्क साधून शक्य त्या सर्व मार्गाने उपचाराची रक्कम उभारण्याचे आवाहन रूग्णालय व्यवस्थापनाला केले. या सर्वांच्या आवाहनाला एम.आर.आर.रूग्णालय व्यवस्थापक योगेश खाचणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी केलेल्या यशस्वी समन्वयातून उद्योजक, व्यावसायिक आणि समाजातील दात्यांकडून आठ लाख पंचवीस हजार रूपयांचा निधी जमा करण्यात आला. रेयांशच्या उपचारासाठी लागणारा पूर्ण खर्च उभारण्यात यश आले — विशेष म्हणजे, कुटुंबाला शस्त्रक्रियेसाठी एकही रुपया खर्च करावा लागला नाही!

   एमआरआर रुग्णालयातील बालहृदयतज्ज्ञ डॉ. सारंग गायकवाड, डॉ. निलेश बच्छाव यांनीही पालकांचे समुपदेशन केले आणि यशस्वी उपचाराची दिशा दाखवली. सांगलीतून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस यांनी उमेद जागवली. महिनाभरापूर्वी रेयांशवर गुंतागुंतीची, जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली रेयांशची शस्त्रक्रिया रात्री साडेनऊ वाजेपर्यंत, म्हणजे तब्बल १३ तास चालली. डॉक्टरी कौशल्यामुळे आणि देवाच्या आशीर्वादामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली. याची जाणिव ठेवून पवार कुटुंबाने जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानले.    जिल्हाधिकाऱ्यांचे संवेदनशील नेतृत्व, डॉक्टरांचे तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य, व्यवस्थापकाची धडपड आणि समाजातील दात्यांची उदारता. यामुळे एक छोट्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आयुष्यभरासाठी उजळले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विधानसभा निवेदन :राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी दोन हजार वारकऱ्यांची उपस्थिती !देव, देश, धर्म यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा !- महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण