भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय-देशातील रेल्वे स्थानकांवर चेहरा तपासणी यंत्रणा…
राज्य प्रतिनिधी –
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला असून देशातील सात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळख प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. या प्रणालीच्या मदतीने गुन्हेगार, बेपत्ता व्यक्ती आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवता येणार असून त्वरित कारवाई शक्य होणार आहे
ही चेहरा ओळख प्रणाली रेल्वे स्थानकांवर लावलेल्या यंत्रणांमार्फत सतत निरीक्षण करत राहील. या प्रणालीतून येणारे चित्रफितीतील चेहरे आधीपासून तयार केलेल्या गुन्हेगारांच्या नोंदीशी ताडून पाहिले जातील. संशयित किंवा शोधात असलेल्या व्यक्तीचे तपशील जुळल्यास संबंधित पोलिस यंत्रणेला त्वरित सूचना दिली जाईल.
सुरुवातीस ही प्रणाली देशातील सात स्थानकांवर राबवण्यात येणार आहे. त्यात मुंबई, पुणे, नाशिक रोड, नागपूर, वडोदरा, अहमदाबाद आणि गांधीनगर या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे ही प्रणाली सुरक्षेसाठी प्रभावी ठरणार आहे.
फक्त गुन्हेगारच नव्हे, तर हरवलेली मुले, वृद्ध नागरिक, तसेच मानसिक स्थिती अस्थिर असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी देखील ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. हा उपक्रम ‘सुरक्षित शहर’ योजनेअंतर्गत राबविण्यात येत असून भविष्यात देशभरात इतर स्थानकांवरही ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, चेहरा ओळख प्रणालीमुळे पोलिस व सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता वाढेल, प्रवाशांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल आणि रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक विश्वासार्ह बनेल. ही योजना प्रभावी ठरल्यास महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.