पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..
नवी मुंबई प्रतिनिधी- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी उशीरा आणि कमी पर्जन्यमान असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने सावध पावले उचलण्यास यापूर्वीच सुरूवात केलेली आहे. या अनुषंगाने स्वत:च्या मालकीचा प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प असूनही पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत उपलब्ध असलेले पाणी पुरविण्याच्या दृष्टीने 10 टक्के पाणीकपात केलेली आहे.
सध्या मोरबे धरìणातील जलसाठ्यात 12.73 टक्के इतकीच पाणी उपलब्धता असल्याने आणखी काही जलस्त्रोतांची चाचपणी करताना नवी मुंबई शहरातील 100 पारंपारिक उघड्या विहीरी कार्यान्वित करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आहे. त्यादृष्टीने तपासणी करण्याचे निर्देशही पाणीपुरवठा विभागाला देण्यात आलेले आहेत.
आयुक्त महोदयांनी निर्देशित केलेली पाणीपुरवठा विषयक उपाययोजना ही जलस्रोत व्यवस्थापनाच्या खबरदारीचा एक भाग आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या आढावा बैठकीदरम्यान पाण्याच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने चर्चा करताना आयुक्तांनी महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे, त्यांची सखोल स्वच्छता करण्याचे तसेच पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागास दिले.
एल निनोच्या परिणामामुळे यावर्षी मान्सून आणखी उशीरा येण्याची शक्यता असल्याने आणि पाणीटंचाईची भीती वाढल्याने हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या विहिरीतील पाण्याचा वापर धुणीभांडी, स्वच्छता आणि उद्याने तसेच बांधकामासाठी करता येऊ शकतो हे लक्षात घेत अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे यांनी सर्व विभाग कार्यालय क्षेत्रातील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना त्यांच्या क्षेत्रातील विहिरींची संपूर्ण स्वच्छता करून त्यांचे पाणी पिण्याशिवाय इतर दुय्यम उपयोगासाठी वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
उघड्या विहिरी या बोअरवेलपेक्षा वेगळ्या असतात. त्यामध्ये आधीपासूनच पाणी असते. मात्र, वापरापूर्वी त्यातील गाळ व कचरा काढून त्या स्वच्छ करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन तशा प्रकारचे निर्देश सर्व अभियंत्यांना देण्यात आलेले आहेत. गृहनिर्माण संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शक्य तेथे विहिरींच्या पाण्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जाहीर केल्यानुसार प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीमुळे मान्सूनचा प्रवास मंदावला आहे. दक्षिण कोकण, महाराष्ट्र आणि सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचला असला तरी त्याची पुढील प्रगती थांबली आहे. कमकुवत वाऱ्यांचा प्रवाह आणि मजबूत मान्सून प्रवाहाचा अभाव यामुळे मान्सूनची उत्तर दिशेकडे वाटचाल मंदावली आहे. तरी पुढील तीन ते चार दिवसांत परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आलेली आहे.
मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून नवी मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा कमी पातळीवर असल्याने १०० पारंपरिक विहिरींचा वापर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिलेले आहेत. अशाप्रकारे या विहिरींचे पाणी वापरात आल्याने यापुढील काळात एक मोठा दिलासा मिळणार आहे.