श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक, आणि भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे धार्मिक स्थळ असलेल्या तसेच जगप्रसिद्ध वेरुळ लेणीचा परिसर असल्याने श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात यात्राचे आयोजन होते. या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, अन्न व औषध प्रशासन विभागाने यात्रेच्या काळात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त द.वि.पाटील, सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वर्षा रोडे, श्रीमती सुरसे, श्रीमती ज्योती जाधव, श्रीमती जावधवर मोहम्म्द फरिद सिद्दीकी, पी.एस. अंजिठेकर यांची उपस्थिती होती.
अन्न विक्रेत्यांनी योग्य परवाने घेतलेले असावेत आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जावे. या महिन्यातील प्रत्येक शनिवारी व सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने शाबुदाणा, भगर व इतर खाद्य पदार्थाच्या खाद्य विक्री केंद्रांची तपासणी नियमितपणे करावी. खराब, मुदत संपलेल्या, साठवणूक व प्रक्रिया निकृष्ट दर्जाची असलेली अन्नपदार्थ विक्रीवर त्वरित दंडात्म्क कारवाई करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच प्रसाद,पाणी,हॉटेलवरील खाद्यपदार्थाची व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले
यात्रा काळात स्थायी स्वरुपाचे कार्यालय येथे सुरु करण्यात यावे. यात अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य इतर विभागाशी समन्वयाने मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. ग्रामपंचायत, नगरपालिका तहसिलदार यांच्याशी संपर्कात राहावे. स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्यात यावे. विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाची विशेष पथके नेमून सतत तपासणी आणि जनजागृती करावी. नागरिकांनी देखील अन्न व पेय पदार्थ खरेदी करताना गुणवत्ता, पॅकिंग व मुदत तपासावी आणि शंका आल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी निर्देश दिले.
अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांनी वितरीत केलेले अन्न सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा त्याहून अधिक वेळ ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शिजवलेले अन्न काही तासांत खराब होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन व ताजे अन्नच वितरित करावे, तसेच उष्णतेमध्ये ठेवलेले अन्न बारकाईने तपासावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अन्नछत्रालये, भंडारे व अन्नदान केंद्रांनी अन्नाचे स्वच्छतेचे नियम पाळणे, वापरलेले पाणी स्वच्छ असणे, व अन्न हाताळताना स्वच्छ कपडे व हातमोजे वापरणे अनिवार्य आहे.
याशिवाय, प्रत्येक अन्नछत्र केंद्राशी सतत संपर्क ठेवून त्यांना अन्न सुरक्षिततेविषयी सूचना दिल्या जाव्यात, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. खराब अन्नामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका होऊ नये यासाठी प्रत्येक अन्नदाता सजग राहावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व शाळांमधील तसेच शाळेच्या परिसरात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमित तपासणी करावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही दुर्लक्ष चालणार नाही. शाळांमध्ये मध्यान्ह भोजन, दूध, फळे, बिस्किटे व खाऊ स्वरूपात दिले जाणारे अन्नपदार्थ, तसेच शाळेच्या परिसरात हातगाड्यांवर किंवा दुकानदारांकडून विक्रीस ठेवले जाणारे फरसाण, चटपटीत खाद्यपदार्थ, थंड पेये व पॅकेज्ड फूड यांची देखील काळजीपूर्वक तपासणी करण्यात यावी.
बिनमुदतीचे, साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे अथवा विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक घटक असलेले अन्नपदार्थ आढळल्यास तात्काळ नमुने घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या.
या तपासणी अहवालचा त्वरीत जिल्हा प्रशासनाला सादर करावेत, तसेच शाळांना मध्ये आवश्यक ती जनजागृती करावी, विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमिकता असून, शाळांमधील अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. असे स्वामी यांनी सांगितले.
श्रावण महिन्यात उपवासाच्या कालावधीत जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपवासाचे खाद्यपदार्थ विक्रीस येतात. भाविकांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी अशा अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार विक्री करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश देण्यात आले आहे.
साबुदाणा, शेंगदाणा, रताळी, राजगिरा, उपवासचे थालीपीठ पीठ, लोणची, सुकामेवा, तयार फरसाण पदार्थ, बटाटा चिप्स, चिवडा, उपवासचे लाडू तसेच खाद्य तेल इत्यादी पदार्थ विक्रीस ठेवताना त्यावर उत्पादन दिनांक, वापरण्याची मुदत, साहित्याची यादी आणि अन्न परवाना क्रमांक यांचा उल्लेख अनिवार्य आहे. विशेषत तयार खाण्यायोग्य पदार्थ विक्री करताना ताजे व दर्जेदार साहित्य वापरणे, स्वच्छ पॅकिंग, बिनमुदतीचे व बिनलेबल पदार्थ विक्रीस न ठेवणे, फ्रिज किंवा योग्य तापमानात अन्न साठवणे,प्लास्टिकच्या थैलीऐवजी अन्नसुरक्षेसाठी सुलभ पर्याय वापरणे,असे काटेकोर नियम पाळणे आवश्यक असल्याचे
जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने यात्राकाळात नियमित तपासण्या राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी व्यापाऱ्यांनी पाळावी. उपवासाच्या नावाखाली निकृष्ट, भेसळयुक्त किंवा सडलेले पदार्थ विक्रीस ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.