
महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन”नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा – विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
नवीमुंबई, प्रतिनिधी:- महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट हा “महसूल दिन” साजरा करण्याबरोबरच 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत “महसूल सप्ताह-2025” साजरा करण्यात येणार आहे. या सात दिवसांत कोकणातील प्रत्येक जिल्हयात शासनाने दिलेल्या सुचनांबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दि. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत शासनाच्या मार्गदर्शनानूसार “महसूल सप्ताह-2025” साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या पूर्वतयारीसाठी आज कोकण महसूल आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीव्दारे आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदूर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचे सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महसूल सप्ताहाच्या प्रारंभी दि. 1 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करणारे, त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणारे, वसूलीच्या नोटीसा वेळोवेळी पाठवणारे, मोजणी करणारे, महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येणार आहे. तसेच 1ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे.
2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वी पासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात येणार आहेत.3 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. 4 ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात येणार आहे.5 ऑगस्ट रोजी विशेष सहय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करुन त्या जमिनी अतिक्रमाणमुक्त करण्यात येणार आहेत. तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल/सरकारजमा) याबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी M-Sand धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेण्यात येतील. महसूल सप्ताहा दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांचे नियोजन करून याबाबतची प्रचार व प्रसिद्धी करण्याबरोबरच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करून विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. 7 दिवस चालणाऱ्या या महसूल सप्ताह-2025 ची व्यापक प्रसिध्दी आणि नागरिकांमाध्ये जनजागृती करावी. अशा सूचना देत जास्तीत जास्त नागरिकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या बैठकीत केले.
*****************



