vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन,पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यात स्वयंसेवी संस्थांना सहभागाचे आवाहन 

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन,पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यात स्वयंसेवी संस्थांना सहभागाचे आवाहन

      नवी मुंबई प्रतिनिधी   महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने वर्षभरातील सर्व सण – उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या सूचनांचे काटेकोर पालन करुन आपले सण – उत्सव हे निसर्गाला पूरक आणि भूमी, वायू, अग्नि, जल, आकाश या नैसर्गिक पंचतत्वांचे रक्षण व संर्वधन करुन साजरे करावयाचे आहेत.

 त्या अनुषंगाने यावर्षी दि.27 ऑगस्ट 2025 पासून श्रीगणेशोत्सवास प्रारंभ होत असून विघ्नहर्ता श्रीगणरायाचा उत्सव हा प्रदूषणाचे विघ्न दूर करुन पर्यावरणशील रितीने ‘इकोफ्रेंडली’ साजरा करण्याकरीता प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. याकरिता खालील बाबींचे पालन करणे अपेक्षित आहे.

   श्रीगणेशमूर्ती चिकणमाती, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), प्लास्टिक आणि सिमेंट यांसारख्या साहित्यापासून बनवल्या जातात. या मूर्तींना सजवण्यासाठी बरेचदा विषारी रंगांचा वापर केला जातो. जेव्हा या मूर्तींचे विसर्जन केले जाते तेव्हा हे रंग व साहित्य पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही, परिणामी पर्यावरणाचे प्रदूषण होते. त्याकरिता पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात यावी.

     गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोल शीट्स आणि प्लास्टिक वापरून बनविलेल्या अविघटनशील साहित्याचा पर्यावरणावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे सजावटीत थर्मोकोल व प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून कागद, पुठ्ठे आणि कापडाचा वापर करण्यात यावा.

      यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील कपडा पुनर्वापर प्रकल्पाच्या ठिकाणी वापरलेल्या कपड्यापासून अत्यंत आकर्षक सजावट साहित्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या कापडी सजावट साहित्याचा वापर करून नागरिक आपली सजावट अत्यंत आगळ्यावेगळ्या पध्दतीने आकर्षक करू शकतात. हे साहित्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावे याकरिता नमुंमपा मुख्यालय तसेच आठही विभाग कार्यालयांमध्ये या साहित्याचे विशेष स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्याचा नागरिकांनी पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.

 उत्सवांमध्ये डीजे, लाऊडस्पिकरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण हा आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असून निवासी भागात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 55 डीबी आणि रात्री 10 ते मध्यरात्रीपर्यंत 45 डीबी पेक्षा जास्त आवाज नसावा. तसेच मध्यरात्रीनंतर लाऊडस्पीकरचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेने नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण कमी करण्याकरिता विसर्जनासाठी सर्वच विभागात सार्वजनिक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी जलप्रदूषण टाळण्यासाठी श्रीमूर्ती विसर्जनासाठी प्राधान्याने कृत्रिम तलावांचा वापर करावा. 6 फूट उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे.

  जलप्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मैदाने, उद्याने, मोकळ्या जागा, मोठ्या सोसायट्या अशा सार्वजनिक स्वरूपाच्या विविध ठिकाणांवर मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करीत असते. या कृत्रिम तलावातच नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जन करावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येते.

  श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे या जनजागृती कार्यात एक सामाजिक जबाबदारी म्हणून विविध स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी कृतीशील नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांचा वापर करावा हा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सक्रिय सहभागी व्हावे असे सर्व संस्थांना आवाहन करण्यात येत आहे.

  महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’, ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025’ आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान’ या अंतर्गत प्लास्टिक व थर्मोकोलमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिव्हल) सण-उत्सव साजरा करावा असे आवाहन आहे. उत्सव कालावधीत नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा, सण समारंभामध्ये टाकाऊ वस्तुंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तुंचा वापर जास्तीतजास्त करावा, फटाक्यांचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त ‘पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव 2025’ साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन

महाकुंभात चेंगराचेंगरी : 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमींची भीती,

vishwatmaklokswamivarta

भामरागड तालुक्यात स्वामित्व योजनेला वेग; १० गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण मालकी हक्काच्या सनद वाटपाचा मार्ग मोकळा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

सांगली पॅटर्न – सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचेशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे” 

vishwatmaklokswamivarta