vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील· नदीजोड प्रकल्प संदर्भात सह्याद्री अतिथी गृह येथे गुंतवणूकदार व बँकर्स समवेत चर्चासत्र..

जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील· नदीजोड प्रकल्प संदर्भात सह्याद्री अतिथी गृह येथे गुंतवणूकदार व बँकर्स समवेत चर्चासत्र..

मुंबई, प्रतिनिधी:- सिंचन क्षेत्राचा विस्तार, शेती, उद्योग व घरगुती वापरासाठी दीर्घकालीन जल नियोजन, आणि पाण्याचा प्रत्येक थेंब सिंचनासाठी हेच नदीजोड प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोठ्या जलप्रकल्पांमुळे शाश्वत विकास, दुष्काळ नियंत्रण आणि संतुलित प्रगती साध्य होईल असे सांगत, भविष्यात जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुया, असे आवाहन जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

राज्यात हाती घेण्यात येत असलेल्या नदीजोड प्रकल्पासंदर्भात गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी, जलसंपदा विषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इन्फास्ट्रक्चर कंपनी, बँकर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील जलसंपदा विकासाला नवी दिशा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चासत्र होत असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने राज्याच्या जलसिंचनामध्ये भरीव वाढ करण्यास प्राधान्य दिले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांत तज्ज्ञ, खासगी भागीदार, वित्तीय संस्था तसेच जनतेचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यात उभारण्यात येणारे सर्वच नदीजोड प्रकल्प परिवर्तनकारी ठरतील. या प्रकल्पांमुळे पाणीटंचाई दूर होऊन विकासाचा समतोल साधण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांची आर्थिक संपन्नता होणार आहे. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणार आहे. यासोबतच शहरी अर्थव्यवस्था व औद्योगिक वाढीसही चालना मिळेल. पुढील पिढ्यांसाठी पाण्याची उपलब्धता होणार असल्यामुळे त्यांच्यापुढे येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट दूर होणार आहे, असा विश्वास जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले, नदीजोड प्रकल्पासाठी आवश्यक परवाने, वित्तपुरवठा, जमीन अधिग्रहण आदि विषय प्राधान्याने सोडवले जातील. या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणाऱ्या हितधारकांकडून नवनवीन कल्पना व सहयोगी उपायांचे स्वागतही करण्यात येईल.

मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आणि जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दमनगंगा- वैतरणा- गोदावरी, नार- पार- गिरणा, दमनगंगा- एकदरे- गोदावरी, वैनगंगा- नळगंगा आणि उल्हास- वैतरणा-गोदावरी या नदीजोड प्रकल्पाबाबत माहिती दिली. नदीजोड प्रकल्पासंदर्भातील चर्चासत्रात १३ कंपन्यांच्या २२ प्रतिनिधींनी आणि सहा बँकर्सच्या १५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला .

सह सचिव तथा मुख्य अभियंता प्रसाद नार्वेकर यांनी सादरीकरण केले. तर जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे यांनी आभार मानले.

०००००००

 

संबंधित पोस्ट

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार: ‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’– आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन१६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत अकोल्याचे ‘एकवीरा मैदान’ चैतन्यमय;संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

वेव्हज परिषद – २०२५-भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ (वेव्हज) चेप्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

पुस्तके माणसाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे सर्वात प्रभावी साधन*पालकमंत्री शंभूराज देसाई*

जूट क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेजूट मार्क इंडिया’ योजनेंतर्गत जनजागृती कार्यशाळा संपन्न

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

vishwatmaklokswamivarta