
शिवसेना २०२२ ची मुंबई महानगरपालिका निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार?
मुंबई प्रतिनिधी पुढच्यावर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात सुरु आहे. मुंबईतील विविध वॉर्ड मधील प्रश्न, नगरसेवकांच्या बैठका आदित्य ठाकरे घेत आहेत. त्यामुळे 2022 मध्ये आदित्य ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
युवा सेनेचे प्रमुख असलेले आदित्य ठाकरे राज्याचे पर्यावरण आणि उपनगरचे पालकमंत्री आहेत. मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित प्रकल्पांमध्ये आदित्य ठाकरे विशेष लक्ष देत आहेत. १९९७ सारखाच प्रयोग पुन्हा एकदा शिवसेना राबवू शकते. त्यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्र विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली होती,बाळासाहेब ठाकरे त्या निवडणुकीचा चेहरा होते. पण रणनितीक आखणी उद्धव यांनीच केली होती. तसाच प्रयोग २०२२ मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. १९९७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक ११० नगरसेवक निवडून आले होते. १९९७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी तिकीट वाटपात ४५ नगरसेवकांची तिकीट कापली होती. मात्र यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे



