नवी मुंबईत प्रदूषणकारी 19 बांधकामे बंद – 42 बांधकामांना नोटीसा समीर ॲप व प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वेबसाईटवरुन हवा गुणवत्ता विषयक अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन
नवी मुंबईत प्रदूषणकारी 19 बांधकामे बंद – 42 बांधकामांना नोटीसा समीर ॲप व प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वेबसाईटवरुन हवा गुणवत्ता विषयक अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन
नवी मुंबई प्रतिनिधी –
नवी मुंबई शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच सन 2024 मध्ये 27 मुद्दयांचा समावेश असलेली वायुप्रदूषण नियंत्रक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली असून त्याचे निरीक्षण व अंमलबजावणी करीता विभागीय स्तरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या अनुषंगाने *डिसेंबर महिन्यात वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणा-या 42 बांधकामांना नोटीसा बजावण्यात आल्या असून 19 बांधकाम साईट वरील कामे बंद करण्यात आलेली आहेत.*
हिवाळी कालावधीत वारा वाहण्याचे प्रमाण संथ असल्याने व वेगवान वा-याच्या अभावाने तसेच वातावरणात आर्द्रता असल्याने जमिनी लगतची प्रदूषके उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे हवेत धुरक्यासारखी (FOG) स्थिती असते. त्यामुळे नवी मुंबईत दरवर्षी हिवाळयाच्या कालावधीत वायू प्रदूषणात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते.
यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच सन 2024 मध्ये 27 मुद्दयांचा समावेश असलेली वायुप्रदूषण नियंत्रक मार्गदर्शक तत्त्वे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जारी केली आहेत. त्या अनुषंगाने ‘जीआरएपी – 4’ अंतर्गत शहराच्या ज्या भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 200 पेक्षा अधिक आढळला आहे अशा 19 ठिकाणांवर सुरु असलेली बांधकामे थांबविण्यात आलेली आहेत.
बांधकाम ठिकाणांवरील प्रदूषण नियंत्रणाकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली असून त्यानुसार प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार *प्रत्येक बांधकाम स्थळी हवा गुणवत्ता मापक उपकरणे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 30 बांधकाम स्थळांवर ही उपकरणे बसविण्यात आली असून उर्वरित बांधकामांवर उपकरणे बसविण्याचे काम सुरु आहे.
या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता विभागीय स्तरावर संबंधित विभाग अधिकारी यांच्या अधिपत्याखाली स्थापत्य उपअभियंता , स्वच्छता अधिकारी/निरीक्षक, नगररचना उपअभियंता अशा अधिकाऱ्यांचे भरारी पथक गठीत करण्यात आले आहे. या भरारी पथकांमार्फत विभागीय क्षेत्रातील बांधकाम व निगडीत बाबींची तपासणी करण्यात येत असून या मध्ये वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या 32 बांधकाम स्थळांना सूचनापत्रे, 10 बांधकाम स्थळांना कारणे दाखवा नोटीसा तसेच 19 बांधकामांना काम बंद नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 173 विकासकांना दंडात्मक नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.
याशिवाय प्रदूषणाला काही प्रमाणात कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यांच्या व पदपथांच्या कडेला साचलेली माती ब्रशव्दारे व मशिनव्दारे साफ करण्यात येत असून ती उचलून नेल्यानंतर प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुवून घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे एनकॅप वाहनाव्दारे हवेमध्ये कारंज्यासारखे प्रक्रियाकृत पाणी फवारून हवेतील धूलिकण जमिनीवर बसतील व वायू प्रदूषण कमी होईल अशी कार्यवाही नियमीतपणे मोठया प्रमाणात सुरु आहे.
सध्या सानपाडयातील हवा गुणवत्ता निर्देशांक मोठया प्रमाणात वाढला असल्याचे वृत्त विविध माध्यमातून प्रसिध्द होताना निदर्शनास येत आहे. वास्तविकत: हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद ही समीर ॲप (SAMEER APP) आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाची (CPCB) वेबसाईट या अधिकृत माध्यमांतून घेतलेली असणे महत्वाचे आहे. तथापि बहुतांशी वेळा ही माहिती त्रयस्थ संस्थांकडून पुरविल्या जाणाऱ्या लो कॉस्ट सेन्सर मॉडेल्स, क्राउड – सोर्स डेटा आधारित अनुमान किंवा उपग्रह आधारित अंदाज येथून घेतली जाते व त्यावर आधारित अंदाज व्यक्त केले जातात. ते केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या (CPCB) मार्गदर्शक तत्वानुसार कॅलिब्रेशन व प्रमाणिकरण प्रक्रियेचे पालन करत नाहीत. त्यामुळे त्याची सत्यता अधिकृत स्त्रोतांशी पडताळून पाहणे आवश्यक आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाची वेबसाईट आणि समीर ॲप वरून पहावेत वायू गुणवत्ता निर्देशांकनेमकी हीच बाब सानपाडा परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदविताना निदर्शनास आली असून ज्या ठिकाणी अशा त्रयस्थ संस्थांचे सेन्सर मॉडेल आहेत तेथील वायू गुणवत्ता निर्देशांक हा Continuous Ambient Air Quality Monitoring Stations (CAAQMS) वरील हवा गुणवत्तेची नोंद अथवा समीर ॲपवरील नोंद यापेक्षा खूप अधिक असल्याचे बहुतांशी आढळून येत आहे.
त्या अनुषंगाने *नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, हवा गुणवत्ता विषयक माहितीसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाची (CPCB) वेबसाईट तसेच SAMEER APP यावर प्रकाशित होणारा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा अधिकृत व विश्वासार्ह मानावा.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हवा गुणवत्ता चांगली राहावी याकरिता आवश्यक त्या उपाययोजना सातत्यपूर्ण रितीने करण्यात येत असून नागरिकांनी याकामी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.