vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर लेखक श्री.सुरेश वांदिले यांचा मार्गदर्शक संवाद*..

*शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर लेखक श्री.सुरेश वांदिले यांचा मार्गदर्शक संवाद*..

        नवी मुंबई प्रतिनिधी-  सोपे शब्द, सुटसुटीत वाक्य, बिनचूक रचना, मोजकी मांडणी व स्पष्ट विचार ही शासकीय सुलेखनाची पंचसूत्री असून मराठी भाषेतील अभिजातता वृध्दिंगत करण्यामध्ये शासकीय मराठी लेखनाचाही महत्वाचा भाग असल्याचे मत सुप्रसिध्द लेखक व शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे निवृत्त संचालक श्री.सुरेश वांदिले यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या ‘कार्यालयीन मराठी लेखन आणि मराठी युवकांसाठी करिअरच्या संधी’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले.

      यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री.संजय शिंदे, मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव, कार्यकारी अभियंता श्री.प्रविण गाडे, सहा.आयुक्त श्री.अरुण पाटील तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

      1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर लगेचच भाषा संचालनालयाची स्थापना झाली आणि मराठी भाषेतून शासन व्यवहार सुरु झाला. शासकीय मराठी उत्तम रितीने बोलली व लिहिली जावी यादृष्टीने शासन व्यवहार कोश प्रसिध्द करण्यात आला. या कोशासह प्रशासनिक लेखन, मराठी लेखन मार्गदर्शिका अशी मराठी शब्दभांडार वाढविणारी व त्याचा लेखनात उपयोग करण्यासाठी लाभदायी ठरणारी पुस्तके प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या वाचनात व संग्रहात असायलाच हवीत असे आग्रही मत श्री.सुरेश वांदिले यांनी मांडले.

    आपल्या बोलीचा प्रभाव आपल्या लिखाणावर पडतो, त्यामुळे आपण लिहीलेले जास्तीत जास्त लोकांना समजावे यासाठी प्रमाण भाषेत लिहीले जावे असेही ते म्हणाले. पुस्तके वाचली नाहीत तरी किमान वर्तमानपत्राचे संपादकीय तरी वाचावे, त्यामुळे भाषा समृध्द होईल. ही नियमित सवय लावून आपला व्यासंग वाढवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘भाषिणी’ या केंद्र सरकारने विकसीत केलेल्या विशेष ॲपमध्ये 37 भाषांचा समावेश असून त्यामध्ये मराठीसह 22 भारतीय भाषा आहेत अशी माहिती देत 2025 च्या भाषा धोरणातील महत्वाच्या बाबींविषयी त्यांनी भाष्य केले.

    त्यासोबतच मराठी युवकांसाठी करिअरच्या संधी या विषयावर संवाद साधताना श्री.सुरेश वांदिले यांनी इंजिनिअरींग, मेडिकल अशा ठराविक चौकटीतील क्षेत्रांच्या पलिकडे जाऊन विदयार्थी आणि पालक विचार करीत नाहीत अशी खंत व्यक्त केली. भारत सरकारमार्फत शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या पटकन संधी उपलब्ध होतील अशा सागरी वाहतूक, पर्यटन, हॉटेल मॅनेजमेंट, डिझायनिंग, विमानतळ व्यवस्थापन, क्रीडा व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या‍ शिक्षणसंस्था संपूर्ण देशभरात सुरु असून अशा व्यवसायाभिमुख अभ्यास क्षेत्रांकडे आपण गांभिर्याने पाहिले पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

       याशिवाय पारंपारिक शिक्षण क्षेत्रांच्या पलिकडे जाऊन आगामी 10-15 वर्षात चांगली संधी देणारे योग प्रशिक्षण, वेडींग प्लॅनर, इव्हेंन्ट मॅनेजमेंट, मानसोपचार तज्ज्ञ, सायबर तज्ज्ञ अशा आजच्या जगाशी सुसंगत अनेक व्यवसाय क्षेत्रे आहेत त्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले. मराठी युवकांमध्ये व पालकांमध्ये चौकटीबाहेर जाऊन शिक्षण घेण्याची व रोजगाराची मानसिकता दिसून येत नाही. या चौकटी ओलांडून मोठया संधी उपलब्ध आहेत त्यांचा लाभ घेण्याकडे मराठी तरुणांनी विशेष लक्ष दयावे असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

 

          यावेळी मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद व अभिमान बाळगताना मराठी वाचविण्याकडे असलेली आपली मानसिकता बदलून मराठी वाढविण्याकडे विशेष लक्ष दयावे असे आवाहन केले. इंग्रजी आलीच पाहिजे, मात्र दैनंदिन व्यवहारात मराठी जपली पाहिजे असे सांगताना त्यांनी पंढरीचा विठोबा आणि वारकरी आहेत तोपर्यंत मराठी भाषा प्रवाही राहणार असा विश्वास व्यक्त केला. आपण वेगवेगळया प्रांतातून येतो त्यामुळे आपली बोलीभाषा वेगवेगळी असते. आपण लिहिलेली भाषा सर्वांना समजली पाहिजे यादृष्टीने प्रमाणभाषा महत्वाची असून आपण जास्तीत जास्त शुध्द मराठीत लिहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला प्लॅन- बी तयार ठेवावा अशाही सूचना अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी केल्या.

 

           मराठी भाषा संवर्धन पंधरवडयातील पुढील कार्यक्रम मंगळवार, दि. 27 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 11 वा. मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न होत असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ‘वाचनकट्टा’ ही अभिनव संकल्पना शाळा-महाविद्यालयांत राबवून नव्या पिढीत वाचन प्रेरणा निर्माण करणारे ‘वाचनकट्टा’ या अभिनव संकल्पनेचे संस्थापक श्री.युवराज कदम ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर शिक्षक, पालक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी नागरिक यांच्याशी संवाद साधणार आहेत. तरी नवी मुंबईकर साहित्यप्रेमी नागरिकांनी या विनामूल्य प्रवेश असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

मान्सूनपूर्व काळात घ्यावयाची खबरदारी

ग्रंथ हे ज्ञानाचे प्रेरणा स्त्रोत : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ‘जालना ग्रंथोत्सव 2024’ चे उद्घाटन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे विभागाची जबाबदारी – पालकमंत्री संजय राठोड उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे आढावा

जिल्ह्यातील 80 शाळांमध्ये राबविणार ‘शाळा सुरक्षा कार्यक्रम’;300 आपदा मित्र व सखी देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत