मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून रायगड जिल्ह्यात दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान व दि. ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये संपूर्ण जिल्ह्यात (पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात) मनाई आदेश जारी केला आहे.
हा मनाई आदेश दि.7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान सुरु होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदरच्या कालावधीमध्ये खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे
या कालावधीत पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास किंवा फिरण्यास मनाई आहे. निवडणूक प्रचार करणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे इत्यादी कृतीस मनाई आहे.
राजकीय प्रचार करण्याच्या उद्देशाने बल्क मेसेज करण्यास मनाई आहे. ज्या जिल्हा परिषद व पंचायत समिती हद्दीमध्ये मतदान होणार आहे, तेथे मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते /नेते यांना त्या जिल्हा परिषद व पंचायत समिती हद्दीमध्ये थांबणेस मनाई आहे
लाऊडस्पीकर वापरास मनाई आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, वायरलेस किंवा इतर संपर्क साधने घेवून जाण्यास मनाई आहे. (निवडणुकीशी संबंधीत कामाकरिता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी व सुरक्षेकरीता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी वगळून). मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात लाऊडस्पीकर/मेगाफोन वापरणे / आरडा-ओरड करणे / गोंधळ घालणे/ गैरवर्तन करणे इत्यादी कृती करण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस शस्त्र घेवून जाण्यास मनाई आहे. (अपवाद -मतदान केंद्राच्या सुरक्षेकरिता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी, ज्या व्यक्तीस SPG/Z+ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अशा व्यक्तीस साध्या वेशात एक सुरक्षा रक्षक शस्त्र लपवलेल्या स्थितीत घेवून जाता येईल), मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आस्थापना चालू ठेवण्यास मनाई आहे. मतदारांना देण्यात येणारी चिड्डी पांढऱ्या कागदावर असावी, त्यावर कोणत्याही उमेदवाराचे नाव, पक्षाचे चिन्ह, पक्षाचे नाव नसावे. मतदान केंद्राच्या परिसरात पक्षाचे कार्यकर्त्यांचे निवासस्थाने असल्यास त्याठिकाणी प्रचार करणे, बैठका घेणे, मतदानाकरिता जाणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाहण्यासाठी कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे.. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस वाहन आणण्यास मनाई आहे. (अपवाद अपंग /वृध्द / आजारी मतदारांना घेवून येणारी वाहने). मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसराचे आत राजकीय पक्षांचे / उमेदवारांचे निवडणूक बुथ लावण्यास मनाई आहे.
मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर निवडणूक बुब लावताना खालील अटीचे पालन करावे. बुध लावण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी व बुथ लावण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना आगावू माहिती द्यावी. प्रत्येक बुथवर कमाल एक टेबल, दोन खुर्चा असाव्यात.. प्रचार कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष प्रचाराला भरीव चालना देण्यासाठी, मतदार संघाच्या बाहेरुन पाठीराख्यांना आणण्यासह त्यांच्या समर्थकांची हलवाहलव करतात. हो वस्तुस्थीती लक्षात येता, प्रचार कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी, बाहेरुन आणलेले आहेत व जे त्याच्या / तिच्या मतदारसंघाचे मतदार नाहीत असे राजकीय कार्यकर्ते / पक्ष कार्यकर्ते / मिरवणुकीतील कार्यकर्ते / प्रचार कार्यकर्ते, इत्यादिींना नियमितपणे मतदारसंघामध्ये उपस्थित राहता येणार नाही, कारण प्रचार संपल्यानंतर, त्यांच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण धोक्यात येऊ शकते.
हा मनाई आदेश हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील (पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात) जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाच्या हद्दीत दि.05 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12.00 वा. पासून ते दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.00 वा. पर्यंत अंमलात राहील.
या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.