
राज्यांतर्गत पिकस्पर्धा-खरीप २०२६ : शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, प्रतिनिधी राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पिकस्पर्धेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले
a
यापूर्वी पिकस्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी खरीप हंगाम 2026 पासून स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण 11 पिकांसाठी स्पर्धा होणार आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर होणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांना सहभागाची संधी उपलब्ध आहे. Ĺgस्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान 20 गुंठे, तर इतर पिकांसाठी 40 गुंठे सलग क्षेत्रावर लागवड असणे बंधनकारक आहे. एकाच शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत किंवा रद्द धनादेशाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी 300 रूपये आणि आदिवासी गटासाठी 150 रूपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तालुका स्तरावर अनुक्रमे 5 हजार रूपये, 3 हजार रूपये आणि 2 हजार रूपये, जिल्हा स्तरावर 10 हजार रूपये, 7 हजार रूपये आणि 5 हजार रूपये, तर राज्य स्तरावर 50 हजार रूपये, 40 हजार रूपये आणि 30 हजार रूपये अशी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील “पीक स्पर्धा नोंदणी” या टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
00000



