vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना;दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना;दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने विविध कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेवर दिली.

राज्यातील महामार्गावर चालविण्यात येत असलेल्या खासगी स्लिपर कोच बसेसच्या अपघातासंदर्भात सदस्य धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी सदस्य जयंत पाटील, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, देवयानी फरांदे आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, गेल्या वर्षी झालेल्या भीषण बस अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. संबंधित बस पुणे नोंदणी क्रमांकाची होती आणि प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये समृद्धी महामार्गावरील वैजापूर येथे झालेल्या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. अशा घटना गंभीर आहेत. 25 जणांचा मृत्यू झालेल्या अपघातातील चालक दारूच्या नशेत असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. काही खासगी बस चालक स्लीपर कोचच्या नावाखाली बसमध्ये अनधिकृत बदल करतात. पूर्वी एकच स्लीपर कोच असायचा; आता दोन स्तरांवर स्लीपर कोच बसवले जातात. परदेशात स्लीपर कोचला बंदी आहे; मात्र आपल्या देशात केंद्र सरकारच्या नियमानुसार सेवा सुरू असल्याने बंदी नाही. महाराष्ट्राने बंदी घातली तरी इतर राज्यांत नोंदणीकृत बस येथे येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अपघात रोखण्यासाठी राज्यभर चेकपोस्ट उभारण्यात आले असून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून गेल्या वर्षभरात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण एक टक्क्याने घटले आहे. मात्र हे समाधानकारक नसून अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

वेग नियंत्रणासाठी बसमध्ये 80 किमी प्रतितास मर्यादेचा स्पीडोमीटर बसवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही बस 120 ते 140 किमी वेगाने धावत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच ब्रेक अॅनालायझर यंत्रणा बसवण्याचा विचार सुरू आहे. चालकाने दारू प्यायल्यास ही यंत्रणा बस सुरू होऊ देत नाही. या यंत्रणेची किंमत दीड लाख रुपये आहे. एसटी महामंडळाच्या नव्या बसमध्ये तसेच टाटा आणि अशोक लेलँड कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या बसमध्ये ही यंत्रणा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी बस चालकांनीही ही यंत्रणा बसवावी, असे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रस्ते सुरक्षेसाठी आराखडा तयार केला जात आहे. रिफ्लेक्टर, अॅरो मार्किंग, यु-टर्न आणि स्ट्रेट लेनसाठी दिशादर्शक फलक, 100, 200, 300, 500 मीटर अंतर दर्शवणारे बोर्ड लावण्याची योजना आहे. हा आराखडा राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, एसटी महामंडळाचे मार्ग तसेच महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरही लागू केला जाणार आहे. अंतिम टप्प्यातील या आराखड्याला लवकरच मान्यता मिळेल, असे मंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

सांगली येथे एका बसचे चेसी नंबर वेगवेगळ्या प्रकारे वापरल्याची बाब निदर्शनास आली असून त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन करणे किंवा फसवणूक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून आवश्यक असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात उपस्थित सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री श्री. सरनाईक यांनी दिली.

संबंधित पोस्ट

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

एक भारतीय मुलगा… त्याच्या शेजारी बसलेली जागतिक पातळीवर प्रसिद्ध अभिनेत्री कोण ? फोटो संपूर्ण जगभर व्हायरल होऊ लागला…

vishwatmaklokswamivarta

मराठी शाळांच्या मुद्द्यावर कृतिशील कार्यक्रम; १८ डिसेंबर रोजी मराठी शाळांसाठी हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मोर्चा**मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांची घोषणा**दादर येथे साध्या माणसांचा एल्गार; मराठी अभ्यास केंद्राच्या परिषदेत मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

vishwatmaklokswamivarta

देशाच्या फाळणीच्या वेदना सोसलेल्या हशु अडवाणी यांचे समाजसेवेसाठी योगदान अतुलनीय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार