
‘अफगाणिस्तानात तालिबानने पुन्हा ताबा मिळवल्यानंतर देशातील अनेक नागरिकांनी तालिबान्यांच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडणे पसंत केले,’ ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते…
देश प्रतिनिधी
अफगाणिस्तानात तालिबानने पुन्हा ताबा मिळवल्यानंतर देशातील अनेक नागरिकांनी तालिबान्यांच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडणे पसंत केले. देश सोडणाऱ्या या नागरिकांमध्ये अफगाणिस्तानच्या मुस्लिम नागरिकांसह शीख धर्मीयांचा देखील समावेश होता. देशातील अनेक हिंदू आणि शीख नागरिकांनी या परिस्थितीत अफगाणिस्तान सोडत असताना मिळेल त्या देशात जाण्याचा प्रयत्न केला. यातील बहूतांश अफगाणी शीख भारतात आले. भारताने या संकटाच्या काळात देशात येणाऱ्या या अफगाणी शीख नागिरिकांना देशात आश्रय दिला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापर्यंत भारतीय नागरिकांव्यतिरिक्त अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंसह 550 हून अधिक लोकांना अफगाणिस्तानातमधून बाहेर काढण्यात आले. ‘शीख समुदायाचा हा अफगाणिस्तानमधला शेवट असला तरी भारत ही त्यांच्यासाठी नवी सुरुवात आहे’, असे वक्तव्य शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष परमजीत सिंग यांनी केले होते. अफगाणिस्तानमध्ये शीख धर्माचे अस्तित्व आता हळू हळू संपुष्टात येताना दिसते आहे. याच पार्श्वभुमीवर शीख समुदायाच्या अफगाणिस्तानमधल्या शीख नागरिकांच्या इतिहास जाणून घेऊ.
अफगाणिस्तानमधील शीखांचा इतिहास…अफगाणिस्तानात शीख धर्माचे वास्तव हे पंधराव्या शतकापासून असल्याचे दिसून येते. शीख धर्माच्या स्थापनेपासूनच शीख लोकांचे या ठिकाणी वास्तव्य असल्याची माहिती मानववंशशास्त्रज्ञ आणि दक्षिण आशियाई अभ्यासाचे अभ्यासक रॉबर्ट बॅलार्ड यांनी दिली आहे. बॅलार्ड यांच्यामते अफगाणिस्तानातील हे शीख त्या अफगाणि खत्री समाजातून येतात ज्यांनी नवव्या आणि तेराव्या शतकात बुद्ध आणि इस्लाम धर्म स्विकारण्यास नकार दिला होता.
१६ व्या आणि १८ व्या शतकापासून शीखांच्या वास्तव्याच्या खुणा आढळून येतात. १५०४ मध्ये मुघल सम्राट बाबरने काबूल ताब्यात घेतल्यानंतर लिहीलेल्या आत्मचरित्र ‘बाबरनामा’मध्ये तत्कालीन हिंदुस्थानी लोकांच्या लोकसंख्येबद्दल लिहीताना काबूलमध्ये हिंदुस्थानी लोकांची स्वत:ची बाजारपेठ असल्याचा उल्लेख बाबरने केलेला आढळतो. शीख साम्राज्याचे पहिले राजा महाराजा रणजीत सिंग यांनी आग्नेय भारताच्या उपखंडावर राज्य केले होते. 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अफगाण प्रदेशावर आपली सत्ता निर्माण केली होती. अल्पकाळ टिकलेल्या या साम्राज्याचा १८४९ साली ब्रिटीशांबरोबर झालेल्या युद्धात पाडाव झाला. यावेळची एक महत्वाची बाब म्हणजे या युद्धात शीखांना अफगाणिस्तानचा पाठींबा होता. यावरुन शीख धर्माचे तिथले अस्तित्व दिसून येते. शीखांनी अफगाणिस्तान कधी व का सोडले?अफगाणिस्तानातून शीखांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराला सुरुवात झाली ती अब्दुर रहमान खानच्या कारकिर्दीत. त्यावेळी मुळ अफगाणि लोकांनी अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख धर्मीयांना त्रास दिल्याचे सांगितले जाते. याकाळातच अफगाणिस्तानमधून मोठ्या संख्येने बाहेर पडलेला हा शीख समुदाय भारताकडे आला. भारतात आल्यानंतर पंजाबमधील पटियालामध्ये शीख समुदायाने आपली वस्ती स्थापन केली



