
अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज; ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग..
अमरावती, प्रतिनिधी): जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचे संकट आणि हवामान बदलाचा धोका लक्षात घेता, जिल्हा प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सज्ज झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अमरावती आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, गृह मंत्रालय, भारत सरकार, ‘जीआयझेड’आणि ‘आद्रा इंडिया’ यांच्या सहकार्याने जिल्ह्यात ‘एकात्मिक हवामान जोखीम व्यवस्थापन’ (In CRIS) हा विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील सर्वात असुरक्षित घटक असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांचे तीव्र उष्णतेपासून संरक्षण करणे हा आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात पुसदा, यावली, शिराळा, रोहनखेड, भातकुली, खोलापूर आणि दारापूर यांसारख्या निवडक गावांमध्ये सखोल मूल्यांकन आणि अंतर विश्लेषण करण्यात आले. या प्रक्रियेत अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, शेतमजूर तसेच आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांशी थेट संवाद साधून उष्णतेचा त्यांच्या आरोग्यावर आणि उपजीविकेवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे, आता हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि बाहेरील कामगारांसाठी ‘शितकक्ष कॉरिडॉर’, विश्रांती क्षेत्रे, थंड पाण्याचे डिस्पेंसर आणि ‘ग्रीन शेड’ (हिरव्या सावलीची ठिकाणे) उभारली जाणार आहेत, ज्यामुळे अति तापमानात आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होईल.
केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर जनजागृतीवरही प्रशासनाने मोठा भर दिला आहे. ‘काय करावे आणि काय करू नये’ याबद्दलचे प्रशिक्षण, लिंग-विशिष्ट उष्णता असुरक्षिततेवर चर्चा आणि विविध प्रचार साहित्याद्वारे समुदायाची क्षमता बांधणी केली जाणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी श्री. येरेकर अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात उष्माघाताबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. गृहनिर्माण, आरोग्य, हिरवळीची जागा आणि पाणी या क्षेत्रांमधील समन्वयातून उष्णतेशी संबंधित धोके कमी करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासन आता पूर्णतः सज्ज झाले आहे.
0000000



