विविध उपक्रमांतून नवी मुंबई महानगरपालिकेची जागतिक क्षयरोग दिनी व्यापक जनजागृती
आरोग्य प्रतिनिधी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज 24 मार्च रोजी क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करणारे विविध उपक्रम नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आले. यामध्ये नमुंमपा शाळा क्र. 36, कोपरखैरणे गाव शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने क्षयरोग विषयक रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीनंतर क्षयरोग विषयक जनजागृती करणारे पथनाटय सादर करून मुलांना क्षयरोगाविषयी शास्त्रीय माहिती सहजसोप्या पध्दतीने सांगण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण कटके, शहर क्षयरोग अधिकारी, डॉ. आरती सिंग गनवीर, वैदयकिय अधिकारी व मुख्याध्यापिका श्रीम. दिपाली संख्ये यांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.
त्याचप्रमाणे नमुंमपा सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच रुग्णालयामध्ये पथनाटय सादर करण्यात आले. रोटरी क्लॅब ऑफ मिलेनियम सिटी यांचेमार्फत गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
क्षयरोगाविषयी जनजागृती करणारी पथनाट्ये प्राधान्याने वस्ती पातळीवर झोपडपट्टी व अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आली.
या उपक्रमात लोकसहभागाच्या अनुषंगाने डॉ. डी.वाय.पाटील वैदयकिय महाविदयालय व तेरणा वैदयकिय महाविदयालय अंतर्गत रॅली, पोस्टर्स स्पर्धा, कॉन्फरन्स, पथनाटय, रुग्णांचे आरोग्य शिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 24 मार्च 2026 पासून “टीबी मुक्त भारत अभियान – 100 दिवस अभियान” नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अति. आयुक्त श्री. सुनिल पवार तसेच वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत अतिजोखमीच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांना क्षयरोगाच्या लक्षणांबाबत विचारणा करून त्यांची एक्स – रे द्वारे तपासणी करण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून याचा प्रसार श्वसनाव्दारे होतो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी २५ टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी १० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात.
जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार सन २०३० अखेर क्षयरोगाचे दूरीकरण करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जागतिक स्तरावर दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या क्षयरोगाकडे सर्वाच्या एकत्रित सहकार्याने लक्ष वेधण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.
क्षयरोगाविषयी महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दरवर्षी एक घोषवाक्य प्रसारित केले जाते. यावर्षी “होय। आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो : नेतृत्व नवी मुंबई. समर्थित जनभागिदारी (“Yes! We Can End TB: Led by Navi Mumbai. Powered by Janbhagidari”) हे घोषवाक्य जारी करण्यात आलेले आहे.
यामध्ये महत्वाचे म्हणजे क्षयरोगाचे निर्मूलन करण्याकरीता शासकीय आरोग्य सेवा व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, लॅब्स इत्यादींनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती नमुंमपास कळविणे आवश्यक आहे.
नमुंमपा, खाजगी संस्था व नागरिक एकत्रित आल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नवी मुंबई क्षयरोगमुक्त करणेकरीता खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.