vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बाबासाहेबांच्या विचारांतून घराघरात लोकशाही येईल असा नमुंमपा जागर व्याख्यानमालेत ॲड.वर्षा देशपांडे यांचा विश्वास*

*बाबासाहेबांच्या विचारांतून घराघरात लोकशाही येईल असा नमुंमपा जागर व्याख्यानमालेत ॲड.वर्षा देशपांडे यांचा विश्वास*

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  समानता हवेतून येणार नाही, तर बाबासाहेबांचे विचार घराघरात आणावे लागतील, मग घरामध्ये आपोआप लोकशाही येईल अशा शब्दात विचार मांडत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी स्त्रियांना समान मतदानाचा हक्क देण्यासह 42 हून अधिक कायदे बाबासाहेबांनी केले तो स्त्रीमुक्तीचा खरा इतिहास आहे असे मत व्यक्त केले.

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून ऐरोली से.15 येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात 3 ते 13 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर 2026’ व्याख्यानमालेचे शुभारंभाचे व्याख्यानपुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

          नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या ‘जागर 2026’ व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी स्थायी समितीचे सभापती श्री.अशोक पाटील, नगरसेविका श्रीम.ऐश्वर्या सोनावणे, बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विभागप्रमुख उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, लेट्स रिड फाऊंडेशनचे प्रमुख लेखक- उद्योजक श्री.प्रफुल्ल वानखेडे, शिक्षण मंडळ माजी सदस्य श्री.अंकुश सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

          मुंबईला जाता-येताना लांबून हे भव्यतम स्मारक नजरेस पडत होते व इथे एकदा भेट द्यायचीच अशी इच्छा मनात होती आणि आज याठिकाणी व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले हे माझ्यासाठी स्वप्नवत असल्याची भावना ॲड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केली. स्मारक कसे असावे याचा वस्तुपाठ म्हणजे हे स्मारक असल्याचे मत मांडत सर्वत्र बंद होत चाललेली व्याख्यानाची परंपरा नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात जोपासली जात आहे याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे त्या म्हणाल्या.

          स्त्री ला शक्तीचे रूप मानले जाते पण तिला स्वत:हून पुढाकार घेऊन समान मानले जात नाही हे दुर्दैवाचे असल्याचे सांगत देवी म्हणून पुजू नका, अथवा दासी म्हणून हिणवू नका, तिला माणूस म्हणून स्विकारा हे जास्त गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. शेतीचा शोध स्त्रीने लावला कारण आदीम काळात बीजांकुरे उमलविणारी भूमी तिला तिच्यासारखी वाटली. तिच्याकडेच सृजनाची शक्ती आहे त्यामुळे तिचे महत्व जाणले पाहिजे व नुसते जाणून उपयोग नाही तर ते प्रत्यक्ष व्यवहारात मानले पाहिजे व अंगिकारले पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

          मालमत्तेला नव-यासोबत बायकोचे नाव लागावे म्हणून केलेला संघर्ष, मुलगी नको म्हणून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी द्यावा लागलेला लढा, दारूबंदीसाठी केलेला उठाव अशा विविध आंदोलनातील प्रसंग सांगत ॲड.वर्षा देशपांडे यांनी दारूबंदी केलेल्या सर्व गावातील सरपंच या महिला होत्या हे आवर्जून अधोरेखित केले.

          परिवर्तनाच्या चळवळीचे आम्ही इंजिन आहोत हे सांगताना संसार हा रथ आहे असे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात हॅंडल असलेले पुढचे चाक पुरूषाकडेच असते ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत ही स्थिती बदलून समान पातळीवर असलेल्या रथाच्या दोन चाकांसारखा संसार असायला हवा असे ठाम मत त्यांनी मांडले.

           आज महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि त्यांना नोकरी, व्यवसाय करून घरही उत्तम सांभाळायचे आहे, यामध्ये त्यांना मोठी कसरत करावी लागते. यामध्ये सुपर वूमन होण्यासाठी स्वत:चीच होणारी घुसमट आता स्त्रीने स्वत:च थांबवून आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देत बाई ख-या अर्थाने लोकशाही जगते कारण तिला सर्वांना सहभागी करून घेणे जास्त जमते अशा शब्दात स्त्रियांचे सामर्थ्य सांगितले.

          व्याख्यानाची सांगता त्यांनी, मी लिंग, जात, वर्ण भेद करणार नाही; हुंडा देणार व घेणार नाही, मुलगा मुलगी समान मानीन व लिंगनिदान चाचणी करणार नाही अशी सामुहिक शपथ उपस्थितांनी देत केली. त्यांचे सहकारी श्री.कैलास यांनी बाबा आमटे यांचे प्रेरणागीत गायले.

          ‘युनो पॉप्युलेशन ॲवॉर्ड’ मिळविणा-या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी, जे.आर.डी.टाटा यांच्यानंतरच्या ॲड. वर्षा देशपांडे या केवळ तिस-या भारतीय असून त्यांच्या आंतराष्ट्रीय पुरस्कारासोबत महापौर महोदया आणि इतर मान्यवरांचे छायाचित्र काढण्यात आले.

 

*बाबासाहेबांनी संविधानातून दिलेल्या अधिकारामुळेच महापौर, नगरसेविकापद – महापौर श्रीम.सुजाता पाटील*

 

          महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी जागर व्याख्यानमालेचा शुभारंभ करताना बाबासाहेबांना अभिवादन करीत ते युगपुरूष होते व त्याच्या विचारांनी युगप्रवर्तन झाले अशी भावना व्यक्त करीत अभिवादन केले. या व्याख्यानमालेतून नव्या पिढीला समानता आणि आधुनिकतेचे विचार देण्याचे संस्कार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 32 हून अधिक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पदव्या संपादन करणा-या बाबासाहेबांसमोर उच्चशिक्षित म्हणविणारे आपण ज्युनियर केजीतील विद्यार्थी आहोत अशी भावना महापौरांनी व्यक्त केली.

          बाबासाहेबांनी संविधानातून दिलेल्या अधिकारामुळे महापौर होण्याची संधी लाभली अशी नम्र भावना त्यांनी मांडली. महिला आत्मनिर्भर व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी लखपती दीदी योजना, एनएमएमटी बसेसमध्ये पहिल्या टप्प्यात 400 महिलांना वाहनचालक म्हणून प्रशिक्षण व रोजगार अशा विविध संकल्पना महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.     शिक्षण विभागाच्या उपआयुक्त तथा स्मारकाच्या विभागप्रमुख श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांनी प्रास्ताविकातून 2022 पासून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित केल्या जाणा-या जागर व्याख्यानमालेची वैशिष्ट्ये कथन केली. या व्याख्यानमालेत सर्व दिग्गज व्याख्याते येऊन गेल्याचे सांगताना यावर्षीच्या जागरचा प्रारंभ महिला व्याख्यात्यांमार्फत व्हावा ही महापौरांची इच्छा फलद्रुप होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. *रविवारी 5 एप्रिलला सोशल मिडीया स्टार सुप्रसिध्द गायिका रसिका व कृतिका बोरकर स्मारकात*      दि. 3 एप्रिलपासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेच्या पहिल्याच व्याख्यानाला श्रोत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यापुढील काळात ही गर्दी वाढत जाणार असून रविवार दि. 5 एप्रिल रोजी सायं. 6.30 वा. आंबेडकरी गीतांचा ‘अनप्लग्ड जलसा’ सादर करणा-या व सोशल मिडीयावर लाखो फॉलोअर्स असणा-या नव्या पिढीतील लोकप्रिय गायिका ‘रसिका व कृतिका’ या ‘बोरकर’ भगिनी सुसंवाद साधणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार श्री. विनोद राऊत त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा संगीतमय जीवनप्रवास भीमगीतांच्या सादरीकरणासह उलगडविणार आहेत. तरी या युवा पिढीच्या लोकप्रिय गायिकांची कला अनुभविण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

कामोठे मधील इंडो स्कॉट स्कूलचे मैदान दुमदुमले देशभक्तीपर घोषणांनी* *श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त* “*भारताच्या नकाशाची देशाची मानवी प्रतिकृती साकार*”

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

vishwatmaklokswamivarta

विद्युत रोषणाई आपणास १८ ते २३ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत सायंकाळी ६:३० ते मध्यरात्री १२ पर्यंत पाहता येईल.

vishwatmaklokswamivarta

श्री पोद्दारेश्वर राममंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूजन…

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

vishwatmaklokswamivarta