रोजगार व असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ
अहिल्यानगर, प्रतिनिधी : राज्यातील रोजगार, बेरोजगारी तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांबाबत अचूक माहिती संकलित करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्र उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण या दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ सहआयुक्त, नगर पालिका प्रशासन, डॉ. प्रदीप पठारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी तथा उपआयुक्त, सांख्यिकी कार्यालयाचे दीपक दातीर, सांख्यिकी सहाय्यक रवि केशव निकाळजे तसेच अन्वेषक प्रशांत आसने, रामचंद्र कदम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. प्रदीप पठारे म्हणाले की, रोजगार व असंघटित क्षेत्राबाबतची अचूक माहिती उपलब्ध झाल्यास शासनाला विविध योजनांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. बेरोजगारी, स्वयंरोजगार, उद्योगांची स्थिती तसेच नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत देशभर हे सर्वेक्षण राबविण्यात येत असून, त्यातून रोजगार व असंघटित क्षेत्राचा सखोल अभ्यास होऊन शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे नागरिकांची आर्थिक स्थिती, रोजगाराचे स्वरूप, उद्योग-व्यवसाय, वेतन, कामगारांची संख्या तसेच स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधींबाबत माहिती संकलित करण्यात येणार आहे.
नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्र उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण यांच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील उद्योगांची सद्यस्थिती, महिलांचा रोजगारातील सहभाग, स्वयंरोजगार तसेच व्यवसायक्षेत्रातील बदल यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणांतून प्राप्त होणारी अचूक माहिती शासनाला रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, उद्योजकता प्रोत्साहन आणि विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी नागरिकांशी समन्वय साधून अचूक माहिती संकलित करावी तसेच नागरिकांनीही योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.#कामगारशक्तीसर्वेक्षण #LabourSurvey2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #असंघटितक्षेत्र #UnorganizedSector #रोजगारमाहिती #EmploymentData #सांख्यिकीकार्यालय