vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

शहापूर तालुक्यातील वाशाळा येथे १०३ गरोदर मातांना मोफत सुकामेवा वाटप प्रतीक्षा झावर फाउंडेशन आणि ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचा कुपोषण निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम.

शहापूर तालुक्यातील वाशाळा येथे १०३ गरोदर मातांना मोफत सुकामेवा वाटप प्रतीक्षा झावर फाउंडेशन आणि ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचा कुपोषण निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम

ठाणे प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी पाड्यांवरील गरोदर माता व बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्था (कुर्झे) आणि प्रतीक्षा झावर फाउंडेशन (घणसोली, नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मातृछाया’ कार्यक्रमांतर्गत मौजे वाशाळा येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील एकूण ३३ पाड्यांवरील १०३ गरोदर महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून, त्यांना महिनाभर पुरेल इतका सुकामेवा मोफत वाटण्यात आला.

 

शनिवारी सकाळी ११:०० वाजता आयोजित या शिबिरामध्ये महिलांची वजन, रक्तदाब आणि हिमोग्लोबिन आदी तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर गरोदरपणात आवश्यक पोषण मिळावे म्हणून प्रत्येक मातेला काजू, बदाम, अक्रोड, मनुके आणि चणे अशा पाच प्रकारच्या सुक्यामेव्याच्या पाकिटांचे (पॉकेट्स) वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. माधव वाघमारे हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “दुर्गम आदिवासी पाड्यांवरील माता व बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आढळत असल्यामुळे आमची संस्था गेल्या काही वर्षांपासून या भागात आरोग्य शिबिरे, औषधोपचार आणि जनजागृतीचे काम करत आहे. यापुढेही गरोदर मातांची प्रसूती होईपर्यंत दरमहा आरोग्य तपासणी केली जाईल आणि उपकेंद्रामार्फत सुकामेवा वाटप सुरू राहील. आरोग्यविषयक कोणतीही समस्या उद्भवल्यास आशा स्वयंसेविका किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांची मदत घ्यावी आणि प्रसूती घरी न करता रुग्णालयातच करावी.”

 

महिला व बालविकास विभाग (जिल्हा परिषद, ठाणे) च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शोभा शेलार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, कुपोषणासोबतच माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे राबवलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आणि मार्गदर्शक आहे.

 

प्रतीक्षा झावर फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती प्रतीक्षा झावर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “आमच्या संस्थेच्या वतीने मुंबईतील माता रमाई आंबेडकर हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल आणि लोणावळ्यातील पटेल आरोग्य केंद्र येथे आम्ही काही वर्षांपासून सुकामेवा वाटप करत आहोत. परंतु, शहरांपेक्षा ग्रामीण व दुर्गम भागातील मातांना याची अधिक गरज आहे. ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेच्या विनंतीवरून आम्ही येथे पुढाकार घेतला. आज या गरजू आदिवासी मातांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान मिळाले.”

 

या कार्यक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी (शहापूर) श्रीमती कविता जगताप, वाशाळा गावच्या सरपंच श्रीमती मंजुषा आवटे, उपसरपंच विलास धानके, फुगाळे गावचे सरपंच जिवाजी भला, वेळूक गावच्या सरपंच श्रीमती देवकी धोकटे, तसेच ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. रमेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

 

तसेच कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली शेडगे, डॉ. यादव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय धरणे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहा भोळे, डॉ. आर्यचाणक्य भोळे, आणि वाशाळा पथकाचे डॉ. म्हात्रे यांनी मातांची आरोग्य तपासणी केली. या उपक्रमासाठी परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

विशेष लेख-डेंग्यु:नियंत्रण व उपाययोजना

रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात #हृदयरोग निदान व #आरोग्यशिबीर संपन्न शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया                                                                                  

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील एचपीव्ही आणि बीसीजी लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

शहरातील 273 अंगणवाड्यामध्ये बालके, गरोदर,स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना पुरविल्या जातात विविध सेवा..