
तुकाई उपसा जलसिंचन योजनेची कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे अहिल्यानगर जिल्ह्यातील तुकाई व भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा आढावा
मुंबई, प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तातडीने उपलब्ध व्हावा, यादृष्टीने तुकाई उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करावीत असे स्पष्ट निर्देश देत, मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा सिंचन योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मंजूरीसाठी शासनास त्वरित सादर करावा अशा सूचना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.
विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात या दोन योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रा.शिंदे म्हणाले, तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे वन्यजीव विभागाच्या आवश्यक त्या परवानगीसह १५ जुलैच्या आत पूर्ण करुन या योजनेचा शुभारंभ याच दरम्यान व्हावा. तसेच कुकडी धरणातील पाण्याचा लाभ या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळावा.



