
‘नीट’ परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• परीक्षेच्या पूर्वतयारी, सज्जतेचा आढावा• प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त; वैद्यकीय पथके तैनात• सीसीटीव्ही कार्यान्वित; ड्युटी मॅजिस्ट्रेट व स्टेट ऑब्झर्वर यांची नियुक्ती
लातूर, प्रतिनिधी): राष्ट्रीय परीक्षा एजेंसीमार्फत (एनटीए) २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ‘नीट युजी २०२६’ ही परीक्षा पारदर्शकपद्धतीने पार पडावी, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत ‘एनटीए’ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार आवश्यक सुविधा परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असल्याची खात्री करावी. तसेच विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या.
‘नीट युजी २०२६’ या परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी परीक्षा केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य पथकांची नियुक्ती, वाहतूक व्यवस्था आदी बाबींचा आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, तहसीलदार राजाभाऊ कदम, आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड, जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. महेंद्र गायकवाड आणि महेश सूर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात एकूण २६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये लातूर येथील १९, अहमदपूर येथील २, उदगीर येथील २, निलंगा येथील २ आणि चाकूर तालुक्यातील चापोली येथील एका परीक्षा केंद्राचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडावी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये, यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्युटी मॅजिस्ट्रेट’ आणि ‘स्टेट ऑब्झर्वर’ यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. या पथकांकडे आवश्यक औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहतील, याची खात्री करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले.
परीक्षेदिवशी शहरात विद्यार्थी आणि पालकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा. तसेच विद्यार्थी, पालकांनी शक्य तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे नियोजन करावे. तसेच बसस्थानक ते शहरातील परीक्षा केंद्रांपर्यंत सिटी बस, विशेष बस सोडाव्यात. लातूर शहराबाहेर असलेल्या परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठीही विद्यार्थ्यांना बस उपलब्ध होईल, याची खात्री करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले. तसेच परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मोबाईल घेवून जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे कोणीही मोबाईल घेवून परीक्षा केंद्रांवर येवू नये, असे त्यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साळवे यांनी पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती दिली. तसेच जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. गायकवाड आणि श्री. सूर्यवंशी यांनी एनटीए कडून प्राप्त सूचनांबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली परीक्षा केंद्रांची पाहणी
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर शहरातील नीट परीक्षा केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी दयानंद महाविद्यालय, श्री शाहू महाविद्यालय आणि जयक्रांती महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा उपाययोजना, सुविधांचा आढावा घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. महेंद्र गायकवाड आणि महेश सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
*****



