
अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारेमानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची “अमृत” मार्फत सुवर्णसंधी!
रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी:- मानस मित्र प्रशिक्षण नेमकं काय आहे? विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (AMRUT) यांच्या वतीने “अमृत मानसमित्र” समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. हा अभ्यासक्रम मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, Active Listening, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य या विषयांवर आधारित असून सहभागी उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यक्षम समुपदेशक म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.
15 दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण, अधिकृत प्रमाणपत्र, फील्ड प्लेसमेंट व रोजगारक्षम कौशल्य विकासाची संधी हे प्रमुख वैशिष्ट्ये आहे.अधिकृत प्रमाणपत्र- प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
प्रशिक्षणाचे स्वरूप- पुणे येथे प्रथम 15 दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण, Interactive Sessions, Case Studies, Practical Activities आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन. त्यानंतर एक महिना प्रॅक्टिकल फिल्ड एक्सपोजर ( यात जिल्हा पातळीवर एका शाळा महाविद्यालयाला जोडून देण्यात येईल) त्यानंतर 3 ते 5 महिने प्रत्यक्ष व्यवसायासाठी MIMH चे monitoring, mentoring, नियमित ऑनलाईन सत्र आणि प्रत्यक्ष अडचणीचे निवारण आणि मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष व्यावसायिक सहाय्य, असे सर्वसाधारण स्वरूप आहे.
प्रशिक्षण कोण घेणार? संपूर्ण प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे घेतले जाईल. त्याचप्रमाणे अमृतमार्फत विविध तज्ञ मार्गदर्शकाचे वेळोवेळी अनुभवाधारित प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि सहकार्य मिळणार आहे.
प्रशिक्षणानंतर काय?प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH) च्या तज्ज्ञांकडून नियमित ऑनलाइन मार्गदर्शन दिले जाईल. यामध्ये –केस डिस्कशन,नियमित ऑनलाइन सुपरव्हिजन,Mentoring Sessionsप्रत्यक्ष कामातील अडचणींचे निराकरण, व्यावसायिक मार्गदर्शन,कौशल्य वृद्धीसाठी सतत Hand-holding Support यांचा समावेश असेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार कौशल्याधारित शिक्षण, समाजाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षमतेवर भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या समुपदेशना ची तरतूद आहे.
रोजगार व करिअर संधी-अमृत मानस मित्र उपक्रमात मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची संधी, मानसिक आरोग्य क्षेत्रातील रोजगारक्षम कौशल्ये, सामाजिक संस्थांमधील रोजगाराची संधी आणि व्यावसायिक नेटवर्किंग अशा विविध संधी उपलब्ध आहेत.
पात्रता निकष-खालीलपैकी कोणतीही पदव्युत्तर पदवी असलेले अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र ;एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र ;मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW).या क्षेत्रात पूर्वीपासून कार्यरत व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.निवास व्यवस्था-अमृत मानस मित्र हे प्रशिक्षण अमृत च्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत आहे. तथापि प्रशिक्षणासाठी आवश्यक निवास, भोजन व राहण्याची व्यवस्था उमेदवारांनी स्वतः स्वखर्चाने करावयाची आहे.
अर्ज कसा करावा? छाननी प्रक्रिया कशी आहे ?https://mahaamrut.org.in या संकेतस्थळावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा. पात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून, ओरिएंटेशन सत्र आणि इतर आवश्यक परीक्षा/ मुलाखत घेऊन, पात्र व योग्य उमेदवारां ची नावे निश्चित करण्यात येतील. या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन, तसेच प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्त्वानुसार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येतील.अर्ज कधीपर्यंत करता येईल ?पहिल्या बॅच साठी अर्जदारांना 29 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
डॉ. कापसे ( MIMH, पुणे ) यांचे मत :”विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता प्रशिक्षित विद्यार्थी समुपदेशकांची आवश्यकता आज पूर्वीपेक्षा अधिक आहे. ‘अमृत मानसमित्र’ प्रशिक्षण हा केवळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम नसून प्रत्यक्ष कौशल्य विकास, फील्ड अनुभव, तज्ज्ञांचे पर्यवेक्षण आणि व्यावसायिक मार्गदर्शन यांचा समन्वय साधणारा राज्यातील एक अभिनव उपक्रम आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही निश्चितच एक सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.”
इतर माहितीसाठी संपर्क : या योजनेच्या इतर तपशिलासाठी अमृत या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक,अमृत रायगड जिल्हा कार्यालय, कलेक्टर ऑफिस परिसर (भूसंपादन) उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला अलिबाग रायगड 402201 कार्यालयाला भेट देऊन, अमृत जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती घेता येईल.
00000



