vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा;१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्यांसाठी अधिसंख्य पदांना मंजुरी.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा;१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्यांसाठी अधिसंख्य पदांना मंजुरी

बुलढाणा, प्रतिनिधी: राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५, हजार ०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक १,१५३.६० कोटी रुपयांच्या खर्चास शासनाने मंजुरी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णय ३० जून रोजी जारी करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे दीर्घकाळापासून सेवा समायोजनाच्या प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

शासन निर्णयानुसार, २५ जून २०२६ पर्यंत तांत्रिक खंड वगळून सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागातील नियमित मंजूर पदांशी संबंधित कंत्राटी पदांची समकक्षता निश्चित करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार इतर विभागांतील समकक्ष पदांचाही विचार केला जाणार आहे.

 

 

 

पदांची समकक्षता निश्चित करताना संबंधित पदाचे कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, शैक्षणिक पात्रता, सेवा प्रवेश नियम, विद्यमान मानधन तसेच सातव्या वेतन आयोगानुसार लागू असलेली वेतनश्रेणी यांचा विचार करण्यात येणार आहे. वित्त विभागाची मान्यता घेतल्यानंतर संबंधित विभागांकडून अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.समायोजन झालेल्या कर्मचाऱ्यांना समकक्ष पदाच्या वेतनश्रेणीतील किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता व प्रवास भत्ता मिळणार असून, त्यांचे विद्यमान वेतनही संरक्षित राहणार आहे. मात्र, पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लागू असलेले रजेचे नियमच त्यांच्यावर लागू राहतील.

शासनाने अधिसंख्य पदे ही व्यक्तीसापेक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर किंवा अन्य कारणाने सेवा संपुष्टात आल्यानंतर ही पदे आपोआप रद्द होतील. या पदांवर नव्याने नियुक्ती करता येणार नाही तसेच अनुकंपा तत्त्वावरही नियुक्ती दिली जाणार नाही.

दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची नियमितीकरणाची प्रकरणे निर्माण होऊ नयेत यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील मनुष्यबळाची नियुक्ती प्रामुख्याने बाह्यस्त्रोत किंवा सेवा करार पद्धतीने करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. तसेच भविष्यातील पदनिर्मितीचे निर्णय वित्त विभागाच्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतरच घेण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 00000

संबंधित पोस्ट

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रक्तदाब व मधुमेह रुग्णांना मोफत औषध पुरवठा…

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियान

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त विशेष उपक्रमांमधून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये जनजागृती