टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना; 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले
बुलढाणा प्रतिनिधी: इयत्ता 9 वी व 11 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय(OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘टॉप क्लास स्कूल एज्युकेशन’ शिष्यवृत्ती योजना सन 2026-27 साठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक दिपाली पाडवी यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ केवळ इयत्ता 9 वी आणि 11 वीमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अर्जासाठी जात प्रमाणपत्र(OBC/EBC/DNT), वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र, मागील इयत्तेचे गुणपत्रक, शाळेचे प्रवेश किंवा अभ्यास प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शाळेच्या इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर (INO) यांना अर्जाची माहिती देणे आवश्यक आहे, जेणेकरून शाळेकडून अर्जाची ऑनलाईन पडताळणी वेळेत पूर्ण करता येईल. सन 2026-27 साठी योजनेचा प्रारंभ 1 जून 2026 रोजी झाला असून, 31 ऑक्टोबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. त्रुटी असलेल्या अर्जांची तसेच संस्थेमार्फत पडताळणीची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2026, तर जिल्हा, राज्य व मंत्रालय स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 आहे. पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.