vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला नवे बळ देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाला गती देण्यात येत आहे. हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मोर्शी, जिल्हा अमरावती येथील नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, राज्यातील मत्स्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे, आधुनिक संशोधनाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, त्याच्या उभारणीतील प्रत्येक टप्प्याचा नियमित आढावा घेतला जाईल.महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत मोर्शी येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजासाठी मोर्शी येथील सुमारे ४.०८ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी सिंभोरा येथील राष्ट्रीय मत्स्य बीज केंद्राची सुमारे ३३ हेक्टर जमीन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

बैठकीत महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भातील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये, गुणवत्तेची तडजोड होऊ नये आणि नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या दिशेने मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विदर्भासह राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होईल, असा विश्वासही मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

००००

संबंधित पोस्ट

जागतिक योग दिनानिमित्त भाजपा जालना महानगर आणि योग भूमी परिवारातर्फे सामूहिक योगाभ्यास

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण..

स्वाधार’च्या प्रलंबित अर्जांसाठी विशेष मोहीम;त्रुटी दूर करण्यासाठी १६ मार्चपासून कार्यशाळेचे आयोजन

शंखनाद महोत्सव : ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ उद्बोधन सत्र !**राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते!* – मेजर गौरव आर्य, चाणक्य फोरम्

महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे

जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुक; अंतिम प्रभाग रचना जाहीर