नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचा शिक्षक, पालकांसह ‘घरोघरी तिरंगा’ जागर
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत शाळांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांमध्ये ‘घरोघरी तिरंगा’ या मोहीमेअंतर्गत अत्यंत उत्साहाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यामध्ये आंबेडकरनगर रबाळे येथील नवी मुंबई महानगरपालिका पीएश्री राजर्षी शाहू महाराज विद्यालय यांच्या वतीने भव्यतम तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय पोषाखात नटलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासमवेत त्यांचे पालकही शिक्षकांसमवेत सहभागी झाले होते. यामध्ये विशेष म्हणजे त्या भागातील स्वच्छताकर्मींनीही तिरंगा रॅलीत सहभागी होत ‘घरोघरी तिरंगा – घरोघरी स्वच्छता’ हा संदेश प्रसारित केला.
वाशी सेक्टर 16 येथील सेंट लॉरेन्स हायस्कुलनेही शाळेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तिरंगा रॅली काढून देशभक्तीचा नारा दिला.
नमुंमपा शाळा क्रमांक 47, राबाडा या शाळेमध्ये दीप अमावस्येचे औचित्य साधून दीपपूजन करण्यात आले व दीप अमावस्या दिवसाचे महत्व सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांच्या वैशिष्ट्याबद्दल व इतिहासाबद्दलही माहिती सांगण्यात आली आणि राष्ट्रध्वजाची रांगोळी काढून दीपपूजन करण्यात आले.
काही शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहीमेच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभक्तीपर गीतगायन, नृत्य त्याचप्रमाणे चित्रकला व घोषवाक्य स्पर्धाही घेण्यात आल्या.
या दररोज चाललेल्या उपक्रमांमध्ये शालेय स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षक हे पालक, ज्येष्ठ नागरिक यांनाही आमंत्रित करीत असतात व त्यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नियमितपणे होत असते. उपस्थित ज्येष्ठ नागरिक तसेच पालकांनी आपला देश पारतंत्र्यात असताना विविध क्रांतिकारकांनी व नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेली जागृती व दिलेले योगदान आणि बलिदान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
काही शाळांमध्ये माहितीपटाच्या माध्यमातून क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे माहितीपट दाखविण्यात आले तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान वाढावा यादृष्टीने भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लघुपटाद्वारे दाखविण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याविषयी प्रश्न विचारून प्रश्नमंजुषा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहाने सहभागी होतात व विशेष म्हणजे त्यांचे पालकही स्वयंस्फुर्तीने सहभागी होताना दिसत आहेत.