अंतगड सूत्रवाचनातून पर्युषण पर्वाला मंगलमय सुरुवात-आत्मशुद्धी, कर्मनिर्जरा, तप-त्याग आणि क्षमाभावाचा संदेश; आठ दिवस विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन
जालना, प्रतिनिधी :जैन धर्मातील पर्वाधिराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र पर्युषण पर्वाला जालना शहरात मंगळवार, दि. ८ सप्टेंबरपासून भक्तिभावपूर्ण वातावरणात मंगलमय सुरुवात झाली. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने गणेश नगर येथील ‘पावन तपोधाम’ येथे पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्वेतांबर जैन परंपरेत पर्युषण पर्व आठ दिवसांचे असून यंदा ८ ते १५ सप्टेंबरदरम्यान हे पर्व साजरे होत आहे.पर्युषण पर्वाच्या पहिल्याच दिवशी सकाळी अंतगड सूत्रवाचन व प्रवचनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित श्रावक-श्राविकांना पर्युषण पर्वाचे आध्यात्मिक महत्त्व, आत्मशुद्धी, कर्मनिर्जरा, तप, त्याग, संयम, क्षमा आणि मैत्री याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
‘पर्युषण म्हणजे आत्म्याच्या जवळ जाण्याचा काळ’प्रवचनात सांगण्यात आले की, पर्युषण हा केवळ धार्मिक उत्सव नसून स्वतःकडे पाहण्याचा, आत्मपरीक्षण करण्याचा आणि जीवनातील दोष दूर करण्याचा काळ आहे. ‘परि’ आणि ‘उपवस’ या संकल्पनेतून पर्युषणाचा अर्थ स्पष्ट करताना चारही बाजूंनी आत्म्याच्या जवळ राहणे, आत्म्याला तपविणे, दुर्गुणांचे विसर्जन करणे, सद्गुणांचे अर्जन करणे आणि कर्मांची निर्जरा करणे, असा त्याचा आध्यात्मिक अर्थ सांगण्यात आला.या आठ दिवसांत मनुष्याने बाह्य दिखाव्यापेक्षा अंतर्मुख होऊन क्रोध, मान, माया, लोभ, राग-द्वेष, अहंकार यांसारख्या अंतर्गत विकारांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले.
‘कर्मांचे सफाया करण्याचे पर्व’पर्युषण पर्व हे कर्मनिर्जरेचे पर्व असल्याचे स्पष्ट करताना प्रवचनात सांगण्यात आले की, मनुष्याच्या जीवनात कर्मांचा मोठा प्रभाव असतो. तप, त्याग, संयम, ब्रह्मचर्य, दान, भावना आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून कर्मांचे बंधन कमी करण्याचा प्रयत्न या पर्वात केला जातो.‘पर्युषण म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर मनातील विकारांचा उपवास आहे,’ असा भावार्थ यावेळी स्पष्ट करण्यात आला. शरीराला उपवासाने शुद्ध करण्याबरोबरच विचार, वाणी आणि आचरणाची शुद्धता साधणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
क्षमा आणि मैत्री हीच अंतर्गत शत्रूंवर विजयाची शस्त्रेपर्युषण पर्वाकडे एका आध्यात्मिक युद्धाप्रमाणे पाहण्याचे आवाहन करताना मनुष्याने बाहेरील शत्रूंपेक्षा स्वतःच्या मनातील राग, द्वेष, अहंकार व मोह यांच्यावर विजय मिळवावा, असे सांगण्यात आले.या अंतर्गत संघर्षासाठी ‘क्षमा आणि मैत्री’ ही दोन प्रभावी शस्त्रे आहेत, असे प्रवचनात नमूद करण्यात आले. दुसऱ्याने केलेल्या चुकीचा राग मनात न ठेवता क्षमा करणे आणि सर्व जीवांशी मैत्रीभाव ठेवणे, हेच पर्युषण पर्वाचे खरे सार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अंतगड सूत्रातून त्याग आणि तपस्येची प्रेरणापर्युषण पर्वाच्या आठही दिवसांत अंतगड सूत्रवाचन करण्यामागील आध्यात्मिक उद्देशही स्पष्ट करण्यात आला. या सूत्रामध्ये उल्लेख असलेल्या महान साधू-साध्वी, श्रावक-श्राविका आणि धर्मनिष्ठ व्यक्तींच्या जीवनातील त्याग, तपस्या, सहनशीलता, संयम आणि क्षमाभावातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडवून आणावे, असा संदेश देण्यात आला.अंतगड सूत्र हे केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यातील विचारांचे श्रवण, मनन, चिंतन आणि आचरण करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
आगमवाणीचे महत्त्व विशदप्रवचनात जैन आगमांचे स्वरूपही समजावून सांगण्यात आले. सूत्रागम, अर्थागम, तदुभयागम, आत्मागम, अनंतरागम आणि परंपरागम अशा विविध स्वरूपांत ज्ञानपरंपरा पुढे आली असल्याचे सांगण्यात आले.
तीर्थंकरांच्या सर्वज्ञ ज्ञानातून प्रकट झालेली वाणी, गणधरांमार्फत पुढे आलेली ज्ञानपरंपरा आणि गुरु-शिष्य परंपरेतून जतन झालेली आगमवाणी यांचे महत्त्व विशद करण्यात आले. श्रद्धा आणि जिज्ञासा यांच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करून त्याचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे, असेही सांगण्यात आले
‘तेणं कालेणं तेणं समयेणं’चा भावार्थअंतगड सूत्राच्या प्रारंभी येणाऱ्या ‘तेणं कालेणं तेणं समयेणं’ या सूत्रवाक्याचा भावार्थही प्रवचनातून स्पष्ट करण्यात आला. ‘काल’ आणि ‘समय’ या संकल्पनांद्वारे विशिष्ट काळ व प्रसंगाचे निर्देश कसे केले जातात, याची माहिती देण्यात आली.जैन परंपरेतील ६३ शलाकापुरुषांमध्ये २४ तीर्थंकर, १२ चक्रवर्ती, ९ बलदेव, ९ वासुदेव आणि ९ प्रतिवासुदेव यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले
चंपानगरी आणि आर्य सुधर्मा स्वामींचा संदर्भअंतगड सूत्राच्या कथाभागातील चंपानगरीचे वर्णन करताना तिच्या परिसरातील पूर्णभद्र चैत्य, रमणीय उद्यान आणि धार्मिक वातावरणाचा उल्लेख करण्यात आला. त्याच संदर्भात आर्य सुधर्मा स्वामी ५०० शिष्यांसह ग्रामानुग्राम विहार करीत चंपानगरीतील पूर्णभद्र उद्यानात आले, अशी कथा प्रवचनातून सांगण्यात आली.‘स्थविर’ या संकल्पनेचा अर्थ संयमात स्थिर राहणारा आणि इतरांनाही संयमात स्थिर करणारा असा सांगण्यात आला. तसेच ‘आर्य’ म्हणजे केवळ संबोधन नसून उत्तम गुणांचे आचरण करणारा आणि ज्ञान-दर्शन-चारित्राच्या माध्यमातून कर्मरूपी बंधने छेदण्याचा प्रयत्न करणारा साधक, असा भावार्थ स्पष्ट करण्यात आला.आर्य सुधर्मा स्वामींच्या आगमनाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक व धर्मश्रावक आगमवाणी ऐकण्यासाठी एकत्र आले, असा प्रसंगही कथन करण्यात आला.
‘अंतगड शास्त्र हे महायज्ञ’अंतगड सूत्राच्या श्रवणाला ‘महायज्ञ’ अशी उपमा देण्यात आली. या यज्ञात बाह्य वस्तूंची नव्हे, तर मनातील दुर्गुणांची आहुती आणि कर्मबंधांची समाप्ती करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.जिनवाणी ही अमृतधारा असून ती श्रद्धेने, भावपूर्वक आणि चिंतनपूर्वक ऐकल्यास मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत होते. त्यामुळे पर्युषणाच्या काळात प्रत्येकाने नियमितपणे धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले
आठ दिवस विविध धार्मिक उपक्रम,श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पर्युषण पर्वानिमित्त दररोज सकाळी ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत अंतगड सूत्रवाचन व प्रवचन, दुपारी २ ते ३ वाजता कल्पसूत्र वाचन, ३ ते ४ वाजता नवकार महामंत्र जाप आणि त्यानंतर धार्मिक स्पर्धा अथवा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सूर्यास्ताच्या वेळी प्रतिक्रमण होणार असून पुरुषांसाठी गुरू गणेश सभागृहात, तर महिलांसाठी गुरू गणेश सभामंडपात व्यवस्था करण्यात आली आहे
दिवसनिहाय कार्यक्रम
८ सप्टेंबर : प्रत्याख्यान दिवस — टेलिफोन स्पर्धा९ सप्टेंबर : दया दिवस — ‘आओ माला बनाये’ स्पर्धा१० सप्टेंबर : सामायिक दिवस — ध्यानवर्ग पहेली स्पर्धा११ सप्टेंबर : एकासन दिवस — सांस्कृतिक कार्यक्रम१२ सप्टेंबर : आयंबील दिवस — स्मरणशक्ती स्पर्धा१३ सप्टेंबर : एकासन दिवस — स्वर्ग-नरक स्पर्धा१४ सप्टेंबर : सामायिक दिवस — राईट-रॉंग स्पर्धा१५ सप्टेंबर : उपवास दिवस — धार्मिक तंबोला
तसेच १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सामूहिक क्षमापणा आणि दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत गौतमप्रसादी आयोजित करण्यात आली आहे.
धार्मिक वातावरण निर्मितीसाठी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहनपर्युषण पर्वाच्या प्रारंभी तसेच संवत्सरी पर्वाच्या दिवशी सर्वांनी आपापली दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवून धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. पर्युषण काळात दररोज प्रवचनानंतर दुकाने व प्रतिष्ठाने सुरू करता येतील, अशीही सूचना देण्यात आली आहे.एकासना, व्यासना, आयंबील व दया यांसाठी भोजनशाळेची व्यवस्था करण्यात आली असून प्रश्नमंच, नाटिका व इतर विशेष कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे
पर्युषण पर्वाच्या निमित्ताने ‘स्वतःमध्ये परिवर्तन घडविणे, कर्मबंध कमी करणे, सर्वांशी मैत्रीभाव ठेवणे आणि मनापासून क्षमा मागणे व क्षमा करणे’ हा संदेश जालना शहरातील जैन समाजबांधवांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न या धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून होत आहे.या कार्यक्रमासाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेशकुमार चंपालालजी सकलेचा, सचिव डॉ. धरमचंद भवरलालजी गादिया तसेच विश्वस्त, मार्गदर्शक मंडळ व चातुर्मास समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.