आंतरराष्ट्रीय आपत्ती धोका निवारण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष जागरूकता कार्यक्रम एनडीआरएफ व नमुंमपा अग्निशमन दलाच्या जवानांची मदतकार्य प्रात्यक्षिके व उपकरण-साहित्याचे प्रदर्शन.
आंतरराष्ट्रीय आपत्ती धोका निवारण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष जागरूकता कार्यक्रम एनडीआरएफ व नमुंमपा अग्निशमन दलाच्या जवानांची मदतकार्य प्रात्यक्षिके व उपकरण-साहित्याचे प्रदर्शन.
नवी मुंबई प्रतिनिधी- कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, त्यामुळे सतर्क आणि सज्ज राहणे महत्वाचे असून, संकट आलेच तर मी स्वत:चा बचाव करीन व इतरांनाही मदत करेन ही भूमिका प्रत्येकाने जपण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने व अग्निशमन विभागाने पुढाकार घेऊन सोसायट्या, वसाहती, शाळा – महाविद्यालये याठिकाणी आपत्ती आलीच तर घ्यावयाच्या खबरदारीची व उपाययोजनांची प्रात्यक्षिकांसह माहिती द्यावी असे सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय आपत्ती धोका निवारण दिनाचे औचित्य साधून ‘सज्जता, तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आपत्ती सक्षम नवी मुंबईची निर्मिती’ – या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी श्री.पुरूषोत्तम जाधव, एनडीआरएफचे नियंत्रक अधिकारी श्री.गौरव चौहान व श्री.अरूण कुमार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक श्री.विजय जाधव, आगाखान एजन्सी हॅबिटॅट संस्थेच्या प्रतिनिधी श्रीम.अमृता पराडकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमहापौर श्री.दशरथ भगत यांनी आपत्ती आल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यादृष्टीने आधीपासूनच जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केल व एखाद्या आपत्ती प्रसंगात आपल्यामुळे मदतकार्यात अडथळे येणार नाहीत याचीही प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. शालेय जीवनापासूनच म्हणजे के.जी. पासून पी.जी. पर्यंत अभ्यासक्रमातच लष्करी शिक्षणाचा अंतर्भाव करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नागरी भागात आगीच्या घटना जास्त घडतात असे निदर्शनास येत असून वाशीतील एका दुर्घटनेचा प्रसंग कथन करीत अस्ताव्यस्त पार्कींग केलेल्या वाहनांमुळे त्याठिकाणी बचावकार्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन वाहनाला वाहन लावण्यास जागा नव्हती, यामध्ये काही वेळ गेला. ही घटना सांगत नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्याकरिता अग्निशमन विभागाने सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत प्रबोधन करावे असे सूचित केले. सध्या एल-निनोचा वाढता प्रभाव तसेच हवेतील वाढलेला प्रचंड उष्मा अनेक संकटांना निमंत्रण देणारा असून त्यादृष्टीने आपण जागरूक रहायला हवे अशी भूमिका मांडली.
यावेळी आपत्कालीन परिस्थितीत उत्तम कामगिरी करणारे नमुंमपा अग्निशमन दलातील सहा.अग्निशमन केंद्र अधिकारी श्री.प्रेमानंद ठाकूर, अग्निशमन प्रणेता श्री.सुधाकर पाटील, श्री.नवनाथ गरूड, श्री.प्रकाश पाटील, अग्निशामक श्री.गणेश दप्तरे, श्री.नितीन दगडे, श्री.अभिजीत काटकर, श्री.रोहित बांदकर, श्री.अल्पेश गोतारणे, श्री.समाधान महाजन तसेच नमुंमपा कर्मचारी श्री.राज बांगर, श्री.कृष्णा नाईक, श्री.अजित तांडेल, श्री.लवेश पाटील, श्री.लक्ष्मीकांत पाटील त्याचप्रमाणे नेरूळ एलपी जंक्शन वरील 2 मुलींना विद्युत शॉक लागण्याच्या दुर्घटनेत मदतकार्य करणारे नागरिक श्री.प्रवीण महाले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
त्याचप्रमाणे, ‘आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाचे विजयी विद्यार्थी प्राथमिक विभागातील खुशी चव्हाण, श्रेया खरपडे, नितीशकुमार गौतम तसेच माध्यमिक विभागातील अनुज निषाद, अस्मिता गायकवाड, सपना ठाकूर या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे व पारितोषिके प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.योगेश परदेशी यांनी ‘समुदाय आधारित आपत्ती जोखीम निवारण व नागरिकांचा सहभाग’ या विषयावर सुसंवाद साधला तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीम.अंबिका डबराल यांनी ‘शालेय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे यांनी आजच्या दिवसाचे जागतिक स्तरावरील महत्व सांगत नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदतकार्यासाठी नेहमीच सज्ज असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचेमार्फत आपत्कालीन परिस्थितीतील बचाव कार्य, शोध व सुटका मोहीम, आपत्तीग्रस्त नागरिकांना त्यातून बाहेर काढणे व त्यांच्यावरील प्रथमोपचार याविषयी प्रात्यक्षिके दाखविली. नमुंमपा अग्निशमन दलामार्फतही बचाव कार्य पध्दतीचे सादरीकरण करण्यात आले.
मुख्यालयाच्या तळमजल्यावर आयोजित बचाव कार्यासाठी वापरण्यात येणा-या साहित्य व उपकरणांचे प्रदर्शन एनडीआरएफ आणि नमुंमपा अग्निशमन दलामार्फत मांडण्यात आले होते. त्याठिकाणी महापौर, उपमहापौर, आयुक्त व इतर पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देत पाहणी केली. नागरिकांनीही या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेटी दिल्या.