
पदवीधर मतदार संघ निवडणूक; आज (दि.२३) मतदान
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी ५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि.२३ रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने सर्व सज्जता केली आहे. आज दिवसभर मतदान साहित्य घेऊन मतदान चमू आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले.
विधान परिषदेच्या ५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. २३ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ (अखंड) अशी मतदानाची वेळ आहे.
८४२ मतदान केंद्रांवर मतदान
५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. ८४२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ५ औरंगाबाद विभाग मतदार संघात ४१ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणूकीसाठी एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ७७ हजार ७१७ महिला, २ लाख ४८ हजार ९७१ पुरुष आणि १३ इतर असे मतदार आहेत.
मनुष्यबळ तैनात
या निवडणूकीसाठी मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून त्यात ९३५ केंद्राध्यक्ष व २८१४ मतदान अधिकारी आहेत. मंगळवार दि.२७ रोजी वुडस्टर्म डेकार एमआयडीसी चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी ४४५५ अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक निरीक्षक व मदत कक्ष
या निवडणूकीचे निरीक्षक म्हणून श्रीमती माधवी खोडे- चावरे यांची नियुक्ती आहे. तर रामेश्वर रोडगे हे संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९८२२३६६५१९ असा आहे. या निवडणूकीतील मतदान हे मतपत्रिकेद्वारे व पसंतीक्रमानुसार असते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मदत कक्ष तयार करण्यात आला असून त्याचा क्रमांक ०२४०-२३४३१६४ असा आहे.
०००००



