
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून मुरबाडमध्ये जलसंधारणाला गती विविध ग्रामपंचायतींमध्ये २५ ते ३० वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण; तालुक्यात १०० ते १५० बंधारे उभारण्याचे नियोजन
ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करून गावांना जलसमृद्ध बनविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मुरबाड तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येत आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करणे, भूजलपातळी वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे, या उद्देशाने विविध ग्रामपंचायतींमध्ये वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये जलसंधारणाच्या कामांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण, तळेगाव, जडई, मेर्दी, वल्हिवरे, धसई एकलहरे, भोंरांडे आणि दहिगाव चा. यांसह विविध ग्रामपंचायतींमध्ये वनराई बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २५ ते ३० वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आगामी काळात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मिळून १०० ते १५० वनराई बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुरबाडच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी दिलीवनराई बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यास आणि ते जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी, भूजलपातळी
वाढण्यास तसेच विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यास हातभार लागतो. याचा लाभ शेती, पशुधन आणि स्थानिक पातळीवरील पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो.अनियमित पाऊस आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे महत्त्वाची ठरत आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या विकासकामांना चालना देतानाच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभाग यांवर भर देण्यात येत आहे.
नियोजित वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक जलसाठा वाढविण्यास आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. ग्रामपंचायतींनी स्थानिक गरजांनुसार जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन या उपक्रमात लोकसहभाग वाढवावा, यावर भर दिला जात आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा; दुष्काळावर मात करून समृद्ध गाव घडवा!’ या संकल्पनेतून मुरबाड तालुक्यात जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न सुरू असून, जलसमृद्ध आणि शाश्वत ग्रामीण विकासाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
००
2 attachment
• Scanned by Gmail



