रेवदंडा येथे ३० ऑक्टोबरपासून ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ दिवाळीनिमित्त स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांचे ४० हून अधिक स्टॉल्स; नागरिकांना स्वदेशी वस्तूंच्या खरेदीची संधी..
रेवदंडा येथे ३० ऑक्टोबरपासून ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ दिवाळीनिमित्त स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांचे ४० हून अधिक स्टॉल्स; नागरिकांना स्वदेशी वस्तूंच्या खरेदीची संधी..
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : महिला सक्षमीकरण, स्थानिक लघुउद्योगांना चालना आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेच्या वतीने चंपावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने रेवदंडा, ता. अलिबाग येथे ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर ते रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ या तीन दिवसांत भरणाऱ्या या बाजारपेठेत स्थानिक उद्योजकांचे ४० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. दिवाळीच्या खरेदीसोबतच स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची संधी नागरिकांना या उपक्रमातून मिळणार आहे
‘अमृत’ संस्थेच्या माध्यमातून विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी तसेच स्थानिक लघुउद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या विक्री कौशल्यात वाढ करणे आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘अमृत पेठ’मुळे स्थानिक उत्पादकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविता येणार आहेत
दिवाळीचा सण जवळ आल्याने नागरिकांना सणासाठी आवश्यक विविध वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देण्यावर या बाजारपेठेत भर देण्यात येणार आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार असून, उत्पादक आणि विक्रेत्यांनाही आपल्या उत्पादनांची थेट विक्री करून व्यवसाय वाढविण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, उद्योजकांना बाजारपेठ आणि ग्राहकांना वाजवी दरात वस्तू, असा या उपक्रमाचा दुहेरी लाभ आहे.या उपक्रमासाठी चंपावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व व्यावसायिक विश्वास जोशी, पतसंस्थेचे प्रवर्तक दिलीप भाई पटेल, तसेच पतसंस्था आणि ‘अमृत’ संस्थेचे अधिकारी-कर्मचारी विशेष योगदान देत आहेत
रेवदंडा परिसरातील नागरिकांसह रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ला भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या व्यवसायवृद्धीस हातभार लावावा, असे आवाहन शैलेश मराठे, मंगेश ढेबे आणि चंपावती पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत, रायगड जिल्हा व्यवस्थापक – ९११२२२८७५९.