
पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी हजारो रुग्णांनी घेतला ‘महाआरोग्य शिबिरा’चा लाभ
नागपूर, प्रतिनिधी : आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिरात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अजित गोपछडे, आमदार सर्वश्री. प्रवीण दटके, संजय भेंडे, मोहन मते,राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या घटकाला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या हाच या शिबिराचा उद्देश असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सर्वांना आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले. रुग्णालयांची संख्या वाढवली. राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापूर्वी जे गंभीर आजार नव्हते, ते समाविष्ट केले. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे ५७ हजार रुग्णांना ४५२ कोटी रुपये उपचारांसाठी उपलब्ध करून दिले. सर्व धर्मादाय रुग्णालयातील खाटा गरिब रुग्णांसाठी राखीव असल्या पाहिजे, यासाठी डिजिटल पद्धती निर्माण केली.जवळपास १० आजार असे आहेत की जे योजनेच्या ५ लाख रुपयांच्या मर्यादेत बसू शकत नाही, त्यामुळे त्यासाठी ९ लाखांपर्यंत, तर काही आजारांच्या बाबतीत ३५ लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
ऐकू न आल्यामुळे बोलता न येणाऱ्या मुलांची समस्या लक्षात घेता लहान मुलांसाठी कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया निःशुल्क सुरु केल्या. त्यामुळे ही मुले ऐकू शकतील व बोलूही शकतील. पुढच्या पिढीत कोणीही मूक- बधिर असणार नाही, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. दिव्यांग बांधवांना येत्या ९ ऑगस्ट रोजी कृत्रिम पाय- हात यांचे वितरण केले जाणार आहे. सेवा हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे गरिबातल्या गरीब माणसाला मदत करून समाज निरोगी होण्याच्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा होत असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. कँसरवरील काही कॅप्सुल, इंजेक्शन यांचा खर्च प्रचंड आहे. तो कमी करण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.
प्रारंभी माजी आमदार संदीप जोशी यांनी प्रास्ताविकात या शिबिरामागची भूमिका सांगितली. १५ ते २२ जुलै या काळात शहरात विविध ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये ३१ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील साडे चार हजार रुग्णांवर निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती श्री. जोशी यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी, फिरता दवाखाना, रुग्णवाहिका यांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दिव्यांग बांधवांना यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व्हील चेअरचे वितरण करण्यात आले.
अनेक संस्थांतर्फे यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरला देणगी आणि रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. हे सर्व दाते तसेच महाशिबिराच्या आयोजनात सहभागी डॉक्टरांचा सत्कार यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. आभार शिबिराचे सहसंयोजक नगरसेवक रितेश गावंडे यांनी मानले. कायर्क्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.



