vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पीएम किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता पंतप्रधानाच्या हस्ते वितरित; बुलढाण्यातील ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ६७ कोटी ३६ लाख रुपये  • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून सात हजार रुपयांचा आर्थिक आधार • कृषी विज्ञान केंद्रात थेट प्रक्षेपण• आधुनिक तंत्रज्ञान, माती परीक्षण आणि चारा नियोजनावर भर

पीएम किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता पंतप्रधानाच्या हस्ते वितरित; बुलढाण्यातील ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ६७ कोटी ३६ लाख रुपये

• दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून सात हजार रुपयांचा आर्थिक आधार • कृषी विज्ञान केंद्रात थेट प्रक्षेपण• आधुनिक तंत्रज्ञान, माती परीक्षण आणि चारा नियोजनावर भर

बुलढाणा, प्रतिनिधी) : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 3 लाख 36 हजार 825 पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांत 67 कोटी 36 लाख रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. धनराज उंदीरवाडे (संचालक, विस्तार शिक्षण), डॉ. प्रमोद वाकळे (सहयोगी अधिष्ठाता), संतोष डाबरे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी), डॉ. सतीश जाधव (प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, बुलढाणा), अमोल झापे (वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा), ओमसिंग राजपूत, अनुजा सावळे, अॅोड. गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा २४ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. यासोबतच राज्य शासनाकडून दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पाच हजार रुपयांचा अग्रीम लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकूण सात हजार रुपयांचा आर्थिक आधार उपलब्ध होणार आहे.

 

हवामान बदल आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अँड्रॉइड मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा उपयोग करून पिकांवरील रोग व कीड यांचे छायाचित्र अपलोड करून निदान व मार्गदर्शन घेण्याची सुविधा शेतकऱ्यांनी वापरावी. तसेच माती परीक्षणाचे अहवाल शेतकऱ्यांना सहज समजतील, अशा सोप्या मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा. तसेच मातीतील नत्र, स्फुरद व पालाश (NPK) यांचे प्रमाण समजेल अशा पद्धतीने अहवाल देण्याची सूचनाही संबंधित यंत्रणेला करण्यात आली.

 

रब्बी हंगामात चारा पिकांच्या नियोजनावर भर : आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची गरज तसेच पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन करावे. हरभरा, ज्वारी आणि चारा पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याबाबतही माहिती देण्यात आली.

 

विकसित भारताच्या संकल्पनेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा : विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला सक्षमीकरण आणि त्यांचा आर्थिक उपक्रमांमधील सहभाग वाढविणे आवश्यक आहे. शेती आणि पूरक व्यवसायांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार व उत्पन्ननिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. कृषी क्षेत्राच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे यांनी केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी कृषी क्षेत्रातील विविध योजनांची माहिती दिली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच पाणी व चारा व्यवस्थापनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी विविध महिला बचत गट आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत सीईओ विशाल नरवाडे मांडणार कडेपूर ग्रामपंचायतीचा डिजीटल ग्रामविकास- महाराष्ट्र राज्यातर्फे नामनिर्देशन- धर्मशाळा येथे 16, 17 ऑक्टोबरला कार्यक्रम

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली हाजुरीतील १९ कुटुंबांना हक्काच्या घरांच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित