
सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी-जिल्ह्यात 14 डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम..
ठाणे, प्रतिनिधी- राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुसूचीत जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी लाभ देण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यात 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली आहे.
या विशेष मोहिमे अंतर्गत कृषि सहाय्यकांमार्फत प्रत्येक गावातील या दोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विशेष मेळावा आयोजित करून योजनेची माहिती देण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी नोंदणीकृत सूक्ष्म सिंचन वितरक व सेतु केंद्रांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्याने शिबिर घेवून शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेंतर्गत लहान शेतकऱ्यांना ५५% व इतर शेतकऱ्यांना ४५% अनुदान देय आहे. तसेच शासन पत्र क्र.डीबीटी-०३२४/प्र.क्र.७१/१४ अ. दि. १० जून, २०२४ नुसार अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीतील अल्प व अत्यल्प भुधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अदा करण्यात येणार आहे. उर्वरीत १० टक्के/ १५ टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमधून अदा करुन एकूण ९०% अनुदान अदा करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
0000000000



