
रायगड जिल्ह्यात 24 जून ते 08 जुलै 2025 दरम्यान जमावबंदी लागू –अपर जिल्हादंडाधिकारी
रायगड( प्रतिनिधी:-जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शिफारशीनुसार आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार 24 जून 2025 रोजी 00:01 वाजल्यापासून ते 08 जुलै 2025 रोजी रात्री 24:00 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या औद्योगिक भागांमध्ये कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक व जातीय तणावाचे प्रसंग, तसेच दि.27 जून ते दि.6 जुलै 2025 पर्यंत मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण साजरा करण्यात येणार आहे. सदरवेळी मोहरम निमित्त 5 ठिकाणी नमाज पठण करण्यात येणार असून 72 ठिकाणी मिरवणूका काढण्यात येणार आहेत. तसेच दि.6 जुलै 2025 रोजी हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी हा सण साजरा होणार आहे. यामुळे देखील अस्थिरता उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जमावबंदी दरम्यान खालील गोष्टींवर बंदी असेल :शस्त्र, लाठ्या, सुरे, तलवारी इ. वस्तू बाळगणे,स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरणे,दगडफेक किंवा क्षेपणास्त्रे बाळगणे व तयार करणे,प्रतिमा किंवा आकृत्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे,आक्षेपार्ह घोषणा, गाणी किंवा वाद्य वाजविणे,धोकादायक भाषण, हावभाव, चित्रप्रदर्शन पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगी शिवाय जमविणे सूट कोणाला?या अधिसूचनेतून शासकीय अधिकारी, शासकीय कर्तव्यावरील कर्मचारी, तसेच शवयात्रा व अंत्यविधीसाठी जमणारा जमाव, आणि तहसीलदारांच्या परवानगीने आयोजित कार्यक्रम वगळण्यात आले आहेत. तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यासच कोणताही उत्सव, सभा, मिरवणूक आयोजित करता येणार असून त्याची जबाबदारी आयोजकांची असेल.पोलीस व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
००००



