अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 मार्च शेवटची संधी !थकबाकीवर ५० टक्के शास्ती माफी ३१ मार्च २०२६ रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच मिळणार!
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्याची ३१ मार्च 2026 रोजी अंतिम संधी असून, नागरिकांनी ही सुवर्णसंधी न दवडता तात्काळ आपली थकबाकी भरावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे. या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच मर्यादित असून, त्यानंतर विलंब शास्तीवरील सवलत लागू राहणार नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना कर भरण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना घरबसल्या सुरक्षित पद्धतीने कर भरण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nmmc.gov.in) भेट देऊन किंवा WhatsApp Chatbot – 8291920504 माध्यमातूनही सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय शहरातील विविध कर संकलन केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन देखील मालमत्ता कर भरता येत आहे.
अभय योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्तांवरील थकीत कर एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शास्तीवर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. ही सवलत केवळ मर्यादित कालावधीसाठीच लागू असून, ३१ मार्च २०२६ नंतर ती उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे थकबाकीदारांनी ही अंतिम संधी साधून आर्थिक सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्च रोजी शेवटच्या दिवशी कर संकलन केंद्रांची वेळ रात्री १२ पर्यंत वाढविण्यात आली असून, रात्री उशीरापर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन सेवा २४x७ सुरू असल्यामुळे कोणत्याही वेळी कर भरणे शक्य आहे. त्यामुळे नोकरदार वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
तरी अद्याप ज्या नागरिकांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी आजच ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुविधांचा वापर करून आपली थकबाकी भरावी आणि ‘थकबाकीदार’ हा शिक्का कायमचा पुसून टाकावा. अभय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ५० टक्के शास्ती माफीचा लाभ घेण्याची हीच शेवटची संधी असल्याने नागरिकांनी विलंब न करता त्वरित प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.