पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत सोमवारी नशामुक्ती निर्धार पदयात्रा- नशामुक्त सांगलीच्या दिशेने सामूहिक पाऊल- अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्त सांगली सुरक्षित सांगली उपक्रम- कल्पद्रुम मैदानावर सकाळी 8.30 वाजता उपस्थितीचे आवाहन
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत सोमवारी नशामुक्ती निर्धार पदयात्रा- नशामुक्त सांगलीच्या दिशेने सामूहिक पाऊल- अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्त सांगली सुरक्षित सांगली उपक्रम- कल्पद्रुम मैदानावर सकाळी 8.30 वाजता उपस्थितीचे आवाहन
सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवून सुदृढ, सुरक्षित आणि सक्षम समाज घडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गेले दीड वर्ष अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगली साठी नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सांगलीकर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानात गेले वर्षभर ‘कायद्याच्या धाकाद्वारे प्रतिबंध, प्रबोधन आणि पुनर्वसन’ या त्रिसूत्रीने विविध विभागांकडून सामूहिक प्रयत्न करत विविध उपक्रम राबवले गेले. याच अभियानाचा एक भाग म्हणून सोमवार, 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता ‘नशामुक्ती निर्धार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेमध्ये स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहून नशामुक्तीच्या चळवळीला बळ देणार आहेत.
कल्पद्रुम मैदान, नेमिनाथनगर, विश्रामबाग, सांगली येथून रॅली सुरू होणार असून तिची सांगता पोलीस मुख्यालय, सांगली येथे करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे, तरुणाईमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करणे आणि सुरक्षित समाजनिर्मितीसाठी सामूहिक निर्धार करणे, हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे.
शालेय जीवनापासूनच व्यसनमुक्तीचे संस्कार शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा संस्कार घडण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच पुढाकाराने गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये संयम उपक्रम राबवण्यात आला. यात जवळपास २९२ शाळातील ५४४ मास्टरट्रेनर्स ना प्रशिक्षित करण्यात आले. त्यातून जवळपास ११ हजार किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये स्व-नियंत्रण आणि स्व-नियमनाची कौशल्ये विकसित करून त्यांना व्यसनांपासून दूर राहण्यास सक्षम करणे हा याचा मुख्य उद्देश होता. यासाठी ज्ञानप्रबोधिनी संस्था, पुणेला द्यावयाच्या रक्कम रू १५ लाखांच्या मानधनाची व्यवस्थाही पालकमंत्री महोदयांच्या पुढाकारातून करण्यात आली.
तसेच, विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी व तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यसनांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. उपचार व पुनर्वसनाची सुविधा व्यसनाधीन व्यक्तींना केवळ समुपदेशन न करता त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे मोफत समुपदेशन व नाममात्र खर्चात उपचार केले जात आहेत. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींना आवश्यक उपचार मिळण्यास मदत होत असून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनर्वसनाच्या प्रयत्नांना बळ मिळत आहे.
व्यसनमुक्त समाजातून गुन्हेगारीवरही नियंत्रण व्यसनाधीनतेचा परिणाम केवळ व्यक्तीच्या आरोग्यावर होत नाही, तर त्याचा परिणाम कुटुंब, सामाजिक वातावरण आणि कायदा-सुव्यवस्थेवरही होतो. व्यसनाच्या आहारी गेलेले तरुण विविध प्रकारच्या गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे व्यसनमुक्त समाजनिर्मिती ही गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच प्रबोधन, उपचार आणि पुनर्वसन या पातळ्यांवर समन्वयाने काम करण्यात येत आहे.
सामूहिक सहभागातून साकारूया नशामुक्त सांगली नशामुक्त सांगली आणि सुरक्षित सांगली ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी, युवक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतल्यास व्यसनमुक्त समाजनिर्मितीला अधिक व्यापक स्वरूप मिळेल. तरुणाईचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी 24 ऑगस्टच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.