vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांनी केले महामानवाला अभिवादन

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांनी केले महामानवाला अभिवादन

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेचे सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ‘ज्ञान हीच शक्ती’ या संदेशाचा प्रत्यक्ष अविष्कार घडविणारे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी याठिकाणी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

   महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी स्मारकास भेट देऊन विनम्र अभिवादन केले. महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील, सभागृह नेते श्री.सागर नाईक, माजी खासदार श्री.संजीव नाईक, माजी महापौर व नगरसेवक श्री.सुधाकर सोनावणे व इतर नगरसेवक, समिती सदस्य यांनीही स्मारकास भेट देत अभिवादन केले

    सध्या हवेत उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवत असला तरी सायं. 6.30 वाजेपर्यंत 7800 हून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट दिली. सायंकाळी 4 नंतर नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मुलाबाळांसह याठिकाणी भेट देण्यास पसंती दर्शविल्याचे चित्र बघायला मिळाले व भेटी देणा-यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले दिसले. संध्याकाळनंतर वाढलेला नागरिकांचा ओघ रात्री उशीरापर्यंत सुरू राहील असे चित्र होते.

     स्मारकाला भेट देणा-या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने अल्पोपहार व चहापाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. येथील उत्तम व्यवस्थेबद्दल नागरिकांनी महानगरपालिकेची प्रशंसा केली. नवी मुंबईतून ठिकठिकाणाहून निघणा-या मिरवणूका, रॅली यांनीही स्मारकाला भेट देऊन अभिवादन करून पुढे जाण्यास पसंती दर्शविली.

     2021 मध्ये 5 डिसेंबरला स्मारकातील सुविधा लोकार्पण झाल्यानंतर स्मारकाकडे नागरिकांचा सातत्याने ओढा राहिला असून मागील सव्वाचार वर्षात 4 लाख 68 हजार 966 इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी त्या ठिकाणच्या रजिस्टरमध्ये नोंद करून भेट दिलेली आहे. येथील ग्रंथालय, छायाचित्र संग्रहालय, होलोग्राफिक शो अशा विविध सुविधा कक्षांना भेट देत जणू बाबासाहेब आपल्यासोबत आहेत अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात असून अनेक मान्यवर, तज्ज्ञ व्याख्याते व अभ्यासकांनीही जगभरातील बाबासाहेबांच्या स्मारकापेक्षा हे आगळेवेगळे ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत.

  स्मारकातील समृद्ध ग्रंथालयात 5500 हून अधिक बाबासाहेबांनी लिहिलेली तसेच बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर व विचारधारेवर आधारित पुस्तके त्याचप्रमाणे इतर महनीय पुरुषांच्या चरित्रावर आधारित मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. याठिकाणची ऑडिओ व्हिज्युअल ‘इ- लायब्ररी’ देखील आधुनिक काळातील वाचकांना साजेशी आहे. एकंदरीतच हे ग्रंथालय म्हणजे सर्वसामान्य वाचकांप्रमाणेच अभ्यासकांसाठीही ज्ञानसमृद्ध असा ठेवा आहे. ग्रंथालयातील ‘विशेष संविधान कक्ष’ संविधानाची महती मनामनात रुजवण्यासाठी उपयोगी आहे. त्यामध्ये संविधानाच्या मूळ प्रतीची प्रतिकृती नागरिकांना हाताळता येत असून संविधानविषयक ग्रंथसंपदा त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणा-या जिज्ञासूंसाठी अत्यंत उपयोगी आहे.

          बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून 3 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात आलेली ‘जागर’ ही विशेष व्याख्यानमाला नागरिकांच्या अतिशय उत्साही प्रतिसादामुळे यशस्वी झाली. सुप्रसिध्द अभिनेते श्री.सयाजी शिंदे तसेच श्री.किशोर कदम तथा कवी सौमित्र, संपादक-लेखक श्री.श्रीकांत बोजेवार, लोकशाहीर श्री.संभाजी भगत, सामाजिक कार्यकर्त्या ॲड.वर्षा देशपांडे, सुप्रसिध्द गायिका रसिका व कृतिका या बोरकर सिस्टर्स तसेच डॉ.रेवत कानिंदे, श्रीम.दीपा पवार, श्री.सोमनाथ वाघिरे, श्रीम. छाया काविरे या विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणा-या युवा व्याख्यात्यांच्या ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ अशा सर्वच व्याख्यान, सुसंवाद कार्यक्रमांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नागरिकांची वाढती गर्दी पाहून सभागृहाबाहेर एलईडी स्क्रिन लावून व्याख्याने थेट प्रक्षेपित करावी लागली हा सध्याच्या काळातील व्याख्यानांना होणा-या गर्दीचा दुर्मीळ अनुभव या जागर व्याख्यानमालेतून आला.

          अत्याधुनिक ई-लायब्ररीने सुसज्ज ग्रंथालयांप्रमाणेच बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मीळ छायाचित्रांतून साकारणारे छायाचित्र दालन हे स्मारकाचे खास आकर्षण असून त्यामधून अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे अभिप्राय नागरिकांकडून दिले जातात. आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची संधी देणारा अत्याधुनिक होलोग्रफिक प्रेझेंटेशन शो उपस्थितांना भारावून टाकतो. याशिवाय एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र एक वेगळी अनुभूती देते. अशा विविध वैशिष्ट्यांमुळे हे ज्ञानस्मारक सर्वांचेच आकर्षण केंद्र असून या माध्यमातून बाबासाहेबांचे शिक्षण आणि ज्ञानातून सर्वांगीण विकासाचे विचार जनमानसात रूजविले जात आहेत.

          नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त तथा स्मारकाच्या प्रमुख श्रीम.संघरत्ना खिल्लारे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी जयंती उत्सवानिमित्त नागरिकांकरिता सर्व सुविधांची पूर्तता केली होती.जयंती दिनानिमित्त स्मारकाला लक्षवेधक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हे देखील जयंतीदिनाचे खास आकर्षण आहे.

संबंधित पोस्ट

दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती…’जिल्हाधिकारी स्वामी यांचे महिला सक्षमीकरण कार्यशाळेत आवाहन

जयंती दिनानिमित्त विशेष लेख-सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तकोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ठाणे जिल्ह्याचे यश..

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता· नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta