vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार

“माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी- “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” हा राज्यस्तरीय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून या अभियानामध्ये अहिल्यानगर जिल्हा सक्रिय सहभाग घेत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

 

​या अभियानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय उद्घाटन नुकतेच पार पडले असून कार्यक्रमाबाबत कार्यशाळाही संपन्न झाली आहे. ​या अभियानांतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य निर्देशांक सुधारण्यासाठी विविध आरोग्य विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून त्यामध्ये संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, माता व बाल आरोग्य सेवा बळकटीकरण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. संसर्गजन्य आजारांमध्ये कुष्ठरोग, क्षयरोग, जलजन्य आजार जसे की विषमज्वर, गॅस्ट्रो, अतिसार तसेच किटकजन्य आजार जसे की डेंग्यू व मलेरिया यांचे नियंत्रण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच असंसर्गजन्य आजारांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोग या आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्यात येतील.

​माता व बाल आरोग्य अंतर्गत प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात सेवा, लसीकरण, कुटुंब कल्याण, कुपोषण निर्मूलन तसेच अति जोखमीच्या मातांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. याशिवाय शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता राखणे, जैविक कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण व वृक्ष लागवड या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर दिला जाणार आहे. अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे मूल्यमापन निश्चित निर्देशांकांच्या आधारे करण्यात येणार असून एकूण १०० गुणांपैकी ७० पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” म्हणून गौरविण्यात येणार आहे.

​या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य, विभाग व जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे ५ कोटी रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असून द्वितीय क्रमांकास ३ कोटी तर तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. विभागस्तरावर प्रथम क्रमांकास १ कोटी, द्वितीय ७५ लक्ष तर तृतीय ५० लक्ष रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास २५ लक्ष, द्वितीय २० लक्ष व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस १५ लक्ष रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्था (उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय), पंचायत समित्या व जिल्हा परिषदांनाही विविध स्तरांवर स्वतंत्रपणे गौरविण्यात येणार असून त्यासाठीही पारितोषिकांची तरतूद करण्यात आलेली आहे.

 

​या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली असून अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची रूपरेषा तसेच विविध विभागांच्या समन्वयातून आरोग्य निर्देशांक सुधारण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करून ग्रामपातळीवर आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

​जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन अभियानाबाबत जनजागृती करावी व आवश्यक ठराव करून सदर अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यात आरोग्यदायी, स्वच्छ व सक्षम गावांची निर्मिती होण्यास निश्चितच मदत होईल, असेही डॉ. नागरगोजे यांनी कळविले आहे.0000

संबंधित पोस्ट

टी.बी. मुक्त भारतासाठी “निक्षय मित्र” उपक्रमाअंतर्गत पोषण आहार किट वाटप

राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम; आयुष्मान भारत–महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोठ्या सुधारणा लागू

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कारागृहात त्वचारोग तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न..

शाळा, अंगणवाडीतील मुलामुलींच्या आरोग्य तपासणीला सुरुवात३३ आरोग्य पथक नियुक्त ; तालुकानिहाय दररोज गावभेटी..

कुपोषणमुक्त जालना” साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत-जिल्हाधिकारी आशिमा मित्तलमिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे जिल्ह्यात “कुष्ठरोग शोध मोहीम सुरूविना निदान कुष्ठरुग्ण शोधण्यावर भर; २,४३२ पथके करणार सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta