vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संभाव्य एल-निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी वापराचे काटेकोर नियोजन करा – नितीन गावंडे

संभाव्य एल-निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी वापराचे काटेकोर नियोजन करा – नितीन गावंडे

गडचिरोली, प्रतिनिधी: प्रशांत महासागरातील हवामानाशी संबंधित ‘एल निनो’ प्रक्रियेचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर आणि नियोजनबद्ध वापर करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य एल निनो परिणाम आणि पाणीटंचाई प्रतिबंधक उपाययोजना याबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री नितीन गावंडे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पाणी साठवणूक क्षमतेवर भर,श्री गावंडे यांनी जिल्ह्यात यापूर्वी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीत राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्याआधारे प्रभावी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक विभागाने स्वतंत्र नियोजन तयार ठेवावे तसेच स्थानिक परिस्थितीनुसार तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील पाणी साठवणूक बंधारे, मामा तलाव, पाझर तलाव तसेच इतर जलस्रोतांची तातडीने पाहणी करून आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जलस्रोतांमधील गाळ काढून पाणी साठवणुकीची क्षमता वाढविण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पाणी अपव्यय रोखण्याच्या सूचनासध्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पाणी गळती व अपव्यय टाळण्याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व नियोजनपूर्वक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटू नयेत यासाठी आवश्यकतेनुसार संबंधित जलस्रोतांच्या ५०० मीटर परिसरातील बोअरवेल्सवर बंदी घालण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

शेतकरी आणि पशुधनासाठीही नियोजनएल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजानुसार पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. कमी पाण्यात येणारी पिके, पावसाच्या स्थितीनुसार पेरणीचे नियोजन तसेच हवामान आधारित शेती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.याशिवाय संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन जनावरांसाठी चारा उपलब्ध राहील याबाबत आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनधरणातून पाणी सोडण्याचे नियोजन शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे तसेच उपलब्ध जलसाठ्याचा दीर्घकालीन विचार करून वापर करण्यात यावा, असे प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी सांगितले. एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून सज्ज राहावे तसेच नागरिकांनीही पाणी बचतीबाबत जागरूक राहून उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.बैठकीला सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट,आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनाने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

छायाचित्र प्रदर्शनातून उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारयांच्या जीवनप्रवासाचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर