vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मोरबे धरण आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणीव्दारे घेतला सविस्तर आढावा

मोरबे धरण आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणीव्दारे घेतला सविस्तर आढावा

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-    मोरबे धरणामध्ये 17 टक्के पाणीसाठा असून जुलै अखेरपर्यंत नवी मुंबईकरांना पुरेल एवढे पाणी आपल्याकडे आहे, त्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र यावर्षी पाऊस उशीरा व कमी येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आला असून त्यादृष्टीने खबरदारी घेत आपण सद्यस्थितीत 10 टक्के पाणीकपात केलेली असून नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा गरजेपुरताच वापर करावा आणि जलबचत करावी असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केले.

          नवी मुंबईच्या मोरबे धरण प्रकल्पाची व पाणीपुरवठा व्यवस्थेची अथपासून इतिपर्यंत महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी पत्रकारांसमवेत पाहणी केली. याप्रसंगी उपमहापौर श्री. दशरथ भगत, पाणीपुरवठा समिती सभापती श्री.रविकांत पाटील, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता श्री.शंकर जाधव व श्री.संतोष उनवणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

          वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या दुरदृष्टीच्या संकल्पनेतून मोरबे धरण नवी मुंबई महानगरपालिकेने घेतले असून आज इतर शहरांतील पाण्याची स्थिती बघता आपण नवी मुंबईकर भाग्यवान असल्याचे मत महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी व्यक्त केले. मोरबे धरणाची कमाल पातळी 88 मी. इतकी असून असून सध्या 72 मी. पाणी पातळी आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल असा विश्वास व्यक्त करीत महापौर महोदयांनी पाण्याचा योग्य रितीने वापर केला तर कोणतीही चणचण भासणार नाही असे सांगितले.

          मात्र हवामान खात्याचे यावर्षी कमी पावसाचे अंदाज लक्षात घेऊन आपण दक्षता म्हणून सध्या 10 टक्के पाणीकपात केलेली असून नागरिकांनी मनातील साशंकता दूर करून ही पाणी कपात खबरदारीची उपाययोजना म्हणून केली असल्याचे लक्षात घ्यावे असे सांगत महापौर महोदयांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

          मोरबे धरण प्रकल्पातील जलाशयाच्या काठाशी पाण्यापर्यंत जाऊन तेथील पाणी महापौर महोदयांनी स्वत: प्यायले. तसेच उपमहापौर व इतर पदाधिकारी, अधिकारी यांनीही प्यायले आणि ते स्वच्छ आणि शुध्द असल्याचा निर्वाळा दिला. मूळातच माथेरानसारख्या पर्यावरणाची अतिशय काळजी घेणा-या परिसरातील धावरी नदीवरील हा प्रकल्प असून प्रदूषणविरहित प्रदेश असल्याने या जलस्त्रोतातील पाणी निसर्गत:च स्वच्छ आणि शुध्द आहे. त्यावर पुढे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया होत असून पाण्याच्या आवश्यक चाचण्या केल्या जातात. त्यापुढे आग्रोळी येथील पम्प हाऊसच्या ठिकाणी व नंतर प्रत्येक जलकुंभाच्या ठिकाणीही जल शुध्दीकरण विषयक चाचण्या केल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेची त्या स्थळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. जलवितरण यंत्रणेवर स्वयंचलित निरीक्षण आणि नियंत्रण ठेवणा-या स्काडा प्रणालीचीही यावेळी पाहणी करण्यात आली.

          मागील आठवड्यात महानगरपालिका क्षेत्रात नळाव्दारे पाणी गढुळ येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महापौर महोदया व आयुक्त महोदय यांचे निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने विविध ठिकाणांहून दररोज तब्बल 650 हून अधिक पाणी नमुने घेऊन त्यांची शुध्दता तपासणी केली. या तपासणीत हे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य असल्याचे आढळले.

          नुकताच मोरबेच्या मुख्य जलवाहिनीवर 2 दिवसांचा शटडाऊन घेतल्याने जलवाहिन्या पूर्ण रिकाम्या झाल्या होत्या. त्यामुळे त्या रिकाम्या पाईपलाईनमध्ये खालील बाजूस बसलेला बारीक गाळ व पाईपला चिकटलेले मातीचे कण पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर सुरूवातीला वेगाने येणा-या पाण्याच्या प्रवाहात ढवळले गेले व सुरूवातीला काही काळ पाणी गढुळ आले. त्याचप्रमाणे ज्या इमारतींच्या स्वत:च्या पाण्याच्या टाक्या आहेत. त्यांच्या टाक्याही शटडाऊनच्या 2 दिवसांच्या काळात त्यातील पाणी वापरल्याने रिकाम्या झाल्या होत्या. त्यामुळे त्या साफ करूनही काही कालावधी उलटलेला असल्याने पाणी पूर्ववत झाल्यानंतर त्यामधीलही बारीक गाळ पाण्यात ढवळला गेला आणि काहीसे गढुळ पाणी नागरिकांच्या नळाव्दारे आले. याबाबत महानगरपालिकेने तत्परतेने पावले उचलत ज्या ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्या त्या ठिकाणी पोहचून व पाण्याच्या चाचण्या घेऊन नागरिकांचे शंका समाधान केले. तथापि यापुढील काळातही गढुळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्या तर त्या ठिकाणी पोहचून त्यांचे त्वरित निवारण करावे असे निर्देश महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले व नागरिकांनीही महानगरपालिकेशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन केले.

          सध्या उन्हाचे आणि हवेतील उष्म्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांना मळमळ, उलटी, जुलाब असे त्रास होत आहेत. तरी नागरिकांनी शक्यतो 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे तसेच आपल्या शरीराला पाण्याची गरज असल्याने जास्तीत जास्त पाणी प्यावे, मात्र इतर शहरांमधील पाण्याची अडचणीची स्थिती लक्षात घेता आपण पाण्याच्या दृष्टीने नशीबवान आणि जलसमृध्द असलो तरी पाण्याचा जपून वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी या पाहणी दौ-यादरम्यान केले.

00000

संबंधित पोस्ट

आदिवासी समाजावर अन्याय विरोधात पत्रकार परिषद

vishwatmaklokswamivarta

ग्रंथमहोत्सव’चे रुपांतर आनंदसोहळयात व्हावे-पालकमंत्री संजय शिरसाट‘ग्रंथ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

म्हसळा तालुक्यात जमिनीच्या ‘पोटहिस्सा’ मोजणीचा पथदर्शी प्रकल्प**अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार अचूक मोजमाप*

रायगड जिल्ह्यात 25 मे अखेर 65 टँकरद्वारे पाणीपुरवठा64 गावे व 230 वाड्यांतील 1 लाख 13 हजार 701 नागरिकांना दिलासा

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना- तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश..